दुष्काळ संघर्ष यात्रेला बुलढाणा जिल्ह्यात मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद आणि ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यात होणाऱ्या दुष्काळ एल्गार महामोर्चाचा धसका मेहकरच्या भूमिपुत्रांनी घेतला आहे. मेहकर शहरात लावण्यात आलेले दुष्काळ संघर्ष यात्रा आणि एल्गार महामोर्चाचे १५
.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त काल, २७ नोव्हेंबर रोजी मेहकर येथे दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेहकरात आले होते. याच दिवशी शहरात आधीपासून लावण्यात आलेले दुष्काळ संघर्ष यात्रेचे आणि एल्गार महामोर्चाचे बॅनर फाडण्यात आल्याचा, तसेच काही बॅनर चोरून नेण्यात आल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. आता या संपूर्ण प्रकरणावर रविकांत तुपकर यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.

“मला भूमिपुत्रांना एकच सांगायचं आहे, साहेब, बॅनर फाडून किंवा बॅनर चोरून नेऊन शेतकऱ्यांच्या चळवळीचा आवाज तुम्हाला दाबता येणार नाही. आम्ही मर्दासारखे लढणारे लोक आहोत. असे बॅनर फाडून आणि चोरून नेऊन आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला शेतकऱ्यांच्या मनातून तुम्ही काढू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. आम्ही पण हे करू शकतो; पण आम्ही हे करणार नाही, कारण आमचे संस्कार तसे नाहीत,” अशा शब्दांत तुपकर यांनी प्रतापराव जाधव यांच्यावर प्रहार केला.
ज्या भूमिपुत्र समर्थकांनी दुष्काळ संघर्ष यात्रेचे बॅनर चोरून नेले आणि फाडले, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. यासंदर्भात मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या दबावाखाली न येता संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही तुपकर यांनी केली आहे.दरम्यान, काल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईवरूनही तुपकर यांनी प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता बॅनर फाडल्याच्या प्रकरणावरून तुपकर आणि जाधव यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे. ४ डिसेंबरच्या एल्गार महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.