![]()
डॉक्टरांची ऑनलाइन अपॉईंटमेंट घेणाऱ्या महिलेची सायबर चोरट्यांनी तीन लाख 85 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 56 वर्षीय महिला या डेक्कन जिमखाना भागात राहायला आहेत. महिलेचे डोळे दुखत असल्याने त्यांनी कोथरूड भागातील एका नेत्रविकार रुग्णालयाचा संपर्क क्रमांक ऑनलाइन पद्धतीने मिळविण्याचा प्रयत्न केला. महिलेने संबंधित संपर्क क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा चोरट्याने दूरध्वनीवरुन रुग्णांची नोंदणी केली जात नाही. रुग्णालयात नोंदणी करण्यासाठी एका उपयोजनाचा (ॲप) वापर करावा लागेल, असे चोरट्याने त्यांना सांगितले. त्यानंतर चोरट्याने त्यांना एक ॲपच्या माध्यमातून नोंदणी करण्यास सांगितले. संबंधित ॲपचा वापर महिलेने केला.
चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. मोबाइल क्रमांक बँक खात्याला जोडण्यात आला असल्याने चोरट्यांनी बँक खात्यातून तीन लाख 85 हजार रुपये खात्यातून काढून घेतले. ही रक्कम दुसऱ्या एका खात्यात वळविण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक रणजीतसिंह परदेशी तपास करत आहेत.
मोटारीची काच फोडून लॅपटॉप चोरी
मोटारीची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप, रोकड असा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना कात्रज भागातील आंबेगाव परिसरात घडली. याबाबत एका तरुणाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आंबेगाव परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्यांनी कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्ग परिसरात सेवा रस्त्यावर मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडली. मोटारीत ठेवलेला 60 हजारांचा लॅपटॉप, पाकिटातील पाच हजारांची रोकड असा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. पोलीस हवालदार हनुमंत मासाळ तपास करत आहेत.