संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात मांडल्या जाणाऱ्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी शनिवारी (28 नोव्
.
काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांवर ‘पाठीत खंजीर खुपसला’ अशी टीका केली असली, तरी आपण ज्येष्ठ नेत्यांबद्दल असे शब्द वापरणार नाही असे स्पष्ट करत सावंत यांनी भावनिक साद घातली. “या वयात शरद पवार हे न्यायासाठी ठामपणे उभे राहिले असते, तर इतिहासात त्यांची नोंद ‘शेलार मामा’ म्हणून झाली असती,” अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली. तसेच, 2023 ची जनगणना पूर्ण न करता 2011 च्या जुन्या जनगणनेच्या आधारे डिलिमिटेशन करणे हा एससी, एसटी आणि ओबीसी समाजाच्या संवैधानिक अधिकारांवर गदा आणणारा प्रकार असून, शिवसेनेचा या विधेयकाला 100 टक्के विरोध राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
पारिजातक माझ्या दारी, फुले पडती शेजारी
महाविकास आघाडीतील एकजूट आणि लोकसभा निवडणुकीतील यशाची आठवण करून देत अरविंद सावंत यांनी शरद पवार गटाच्या डळमळीत भूमिकेवर बोट ठेवले. शरद पवार गटाने अद्याप अधिकृत निर्णय जाहीर केलेला नसला, तरी गेल्या 2 ते 8 दिवसांत त्यांच्या नेत्यांच्या निवेदनांतून काहीतरी गडबड सुरू असल्याचे जाणवत होते. काल जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंब्याची भाषा केली; वरिष्ठ नेत्यांशी संवाद झाल्याशिवाय ते इतके बोलू शकत नाहीत. मात्र, आम्ही विरोध करतो तेव्हा कारणे सांगतो, तशी त्यांनी पाठिंब्याची कारणे जनतेसमोर स्पष्ट करावीत.

मविआच्या विजयाचा इतिहास
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्या निवडणुकीत शिवसेनेच्या 9, राष्ट्रवादीच्या 8 आणि काँग्रेसच्या त्याहून अधिक जागा निवडून आल्या. तेव्हा उद्धव ठाकरे विनोदाने म्हणाले होते की, “पारिजातक माझ्या दारी आणि फुले पडती शेजारी”—म्हणजे झाड मी लावले आणि फुले इतरांच्या पदरात पडली; तरीही आमच्या मनात कधीही खटकले नाही आणि आम्ही लोकसभेत एकजिनसीपणाने काम केले.
2023च्या जनगणनेऐवजी 2011चा आधार घेणे हा मागासवर्गीयांवर अन्याय
डिलिमिटेशन विधेयकातील संवैधानिक त्रुटींवर बोट ठेवताना अरविंद सावंत यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलेल्या मुद्द्याचे समर्थन केले. मल्लिकार्जुन खरगे यांनी संविधानाच्या कलम 323 चा उल्लेख करत या विधेयकामुळे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि ओबीसी समाजाचे किती मोठे नुकसान होईल, हे अधोरेखित केले. मुळात डिलिमिटेशन विधेयकात अशी तरतूद होती की 2023 च्या जनगणनेला आधार धरून मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल. मात्र, अद्याप 2023 ची जनगणना झालेली नाही किंवा तिची घोषणाही झालेली नाही.
वाढलेल्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे
सरकार आता 2011 च्या जुन्या जनगणनेचा आधार घेत आहे. 2011 नंतर मागासवर्गीयांची लोकसंख्या वाढली असताना त्यांना त्यांच्या वाढलेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणे हा त्यांचा संवैधानिक अधिकार आहे, जो या विधेयकामुळे हिरावला जात आहे.
आम्ही ‘पाठीत खंजीर’ असे शब्द वापरणार नाही
शरद पवारांच्या प्रकृतीविषयी सदिच्छा व्यक्त करत सावंत यांनी त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा बोलून दाखवल्या. दिवाळीपासून शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत, मी स्वतः त्यांना भेटून आलो आहे; त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. विजय वडेट्टीवार यांनी ‘पाठीत खंजीर खुपसला’ असे शब्द वापरले असले तरी मी देशातील या बुजुर्ग नेत्याबद्दल असे शब्द वापरणार नाही.
लहानसहान कारणांसाठी बाजू बदलण्याची गरज नव्हती
माझ्यासारख्या सामान्य सैनिकाची हीच अपेक्षा होती की, या वयात त्यांनी ठामपणे उभे राहून दाखवले असते तर ते अधिक प्रभावशाली ठरले असते आणि इतिहासात ‘शेलार मामा’ म्हणून त्यांची नोंद झाली असती. काही बारीकसारीक गोष्टींसाठी तिकडे जाण्याची गरज होती का, याचे उत्तर त्यांनाच माहीत. आज अजित पवार गटाकडे आमदारांची संख्या मोठी आहे, तर शरद पवार गटाकडे 8 ते 10 आमदार आहेत; मध्यंतरी दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेही वैतागल्या होत्या.
आमचा 100 टक्के विरोध कायम राहील!
मला एका सामान्य नागरिकाचा व्हॉट्सॲप मेसेज आला, ज्यात त्याने चिंता व्यक्त केली की खासदारांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवल्यास देशाच्या तिजोरीवर पडणाऱ्या प्रचंड आर्थिक भाराचा विचार कोण करणार? आमची शिवसेना ही संघर्षातून उभी राहिली आहे. शिवसेना सत्तेसाठी नाही, तर सत्यासाठी आहे. सत्ता हे आमचे साधन आहे, साध्य नाही; ज्यांचे सत्ता हेच अंतिम साध्य असते, ते कोणताही मार्ग अवलंबतात, तसा आमचा इतिहास नाही. सोमवारी संसदेचे अधिवेशन सुरू होत असून उद्या रविवारी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या बैठका होतील आणि आज संध्याकाळी 5 वाजता विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहेत. शरद पवार गट आणि डीएमके (DMK) सारखे पक्ष जर या लढ्यापासून दूर राहिले, तर उद्या देशात होणाऱ्या दुष्परिणामांना तेही कुठेतरी जबाबदार ठरतील, असेही अरविंद सावंत म्हणाले.
——————————————————-
हेही वाचा…
राज ठाकरेंनी 2023 मध्येच केली होती भविष्यवाणी: पवारांची पहिली टीम सत्तेच्या दिशेने गेली, यथावकाश दुसरी टीमही सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच!

केंद्र सरकारने आणलेल्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) आणि महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) एनडीएला (NDA) पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांमुळे शनिवारी (28 नोव्हेंबर) राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी शरद पवार गटाच्या या संभाव्य भूमिकेवर ‘पाठीत खंजीर खुपसला’ अशा शब्दांत टीका सुरू केलेली असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2 जुलै 2023 रोजी केलेले एक जुने ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी