![]()
आयुष्यात कितीही संकटे आली, निराशेने मन व्यापले किंवा परिस्थिती प्रतिकूल असली, तरी भगवंताचे नामस्मरण माणसाला जगण्याचे बळ देते. नामजप हे भगवत्प्राप्तीचे प्रभावी साधन असून, मनातील निराशा दूर करून जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचे सामर्थ्य त्यात आहे, असे निरुपण तुकाराम भगत महाराज यांनी केले. तपोवन परिसरात सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवसाची सेवा करताना ते बोलत होते. डोळ्यांनी दिसत नसले, तरी अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश असेल तर विचारांची उंची किती गाठता येते, याचा प्रत्यय या हरिनाम सप्ताहात आला. अंधत्वावर मात करून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे तुकाराम भगत महाराज यांच्या ओघवत्या, अभ्यासपूर्ण आणि हृदयाला भिडणाऱ्या चिंतनाने पहिल्याच दिवशी भाविक मंत्रमुग्ध झाले. आपल्या प्रवचनातून त्यांनी भक्ती, कर्तव्य, मातृ-पितृ सेवा आणि ध्येयपूर्ती यांचे महत्त्व विविध उदाहरणांसह विशद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे स्मरण करून देताना त्यांनी स्वराज्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या मावळ्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा गौरव केला. कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि ध्येयासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. ‘सकळ तीर्थांची धुरी जे का माता-पिता’ या विचाराचे महत्त्व सांगताना भगत महाराज म्हणाले, आयुष्यात काही प्राप्त करायचे असेल तर सर्वप्रथम आई-वडिलांचे स्मरण करा, त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि त्यांची मनोभावे सेवा करा. जगातील तीर्थक्षेत्रांच्या दर्शनापेक्षा मातृ-पितृ सेवेचे महत्त्व मोठे आहे. ध्येयपूर्तीविषयी बोलताना ते म्हणाले, आमचे जिवलग मित्र लहू बोराटे नेहमी म्हणतात, योग्य ध्येय निश्चित करून त्याचा मनापासून ध्यास घेतला, तर परिश्रम कधीच ओझे वाटत नाहीत. संत तुकाराम महाराजांचे जीवन याचे उत्तम उदाहरण आहे. संकटे, ऊन, वारा, पाऊस आणि कौटुंबिक अडचणीही त्यांच्या नामचिंतनातील निष्ठा डळमळीत करू शकल्या नाहीत. प्रत्येकाने परिस्थितीपेक्षा ध्येयाला महत्त्व देत आपली कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्ये पार पाडावीत, असे आवाहन त्यांनी केले. दृष्टी नसतानाही तुकाराम भगत महाराज यांनी ज्ञानेश्वरीचा शक्य तितका अभ्यास केला आहे. याच अभ्यासाच्या आधारे त्यांनी नाम महिम्याचे विवेचन करत ज्ञानेश्वरीतील, ‘नाम जपते यज्ञ पावन…नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थी.’ या ओवीचा संदर्भ देत नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या अभ्यासपूर्ण चिंतनाने उपस्थित भाविकांची मने जिंकली. यावेळी खोसे महाराज व तपोवन परिसरातील भाविक उपस्थित होते. अंधत्वावर मात करून अध्यात्मज्ञानाची साधना करणाऱ्या भगत महाराजांचे उपस्थितांनी विशेष अभिनंदन केले. भगत महाराजांची अंधत्वावर ज्ञानसाधनेची मात..!
Source link
हरिनाम सप्ताह:नामस्मरणात संकटांवर मात करण्याचे अन् जीवनाला दिशा सामर्थ्य