![]()
ओळख वाढवून व्हिडीओ कॉल आणि भेटीगाठींच्या माध्यमातून आक्षेपार्ह चित्रीकरण करायचे आणि त्याचाच आधार घेत लाखोंची खंडणी उकळायची, असा कथित हनी ट्रॅपचा धक्कादायक प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांना आक्षेपार
.
चंद्रकांत बाळासाहेब जाधव (वय 55, रा. तासगाव, ता. सातारा) यांनी सविता शिंदे, गौरी पंडित आणि सोनाली शिंदे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. 21 ते 25 नोव्हेंबरदरम्यान हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरी पंडित हिने जाधव यांना वारंवार फोन करून एका महिलेसोबतचे आक्षेपार्ह व्हिडीओ आपल्याकडे असल्याचे सांगितले. हे व्हिडीओ संबंधित महिलांनी आपल्याकडे पाठवले असून प्रकरण मिटवायचे असेल तर 20 लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या जाधव यांनी सातारा तालुका पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संशयितांच्या फोन संभाषणांचे रेकॉर्डिंग सुरू केले. तपासादरम्यान तडजोडीअंती 10 लाख रुपये घेण्याचे ठरल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी 9 लाख 80 हजार रुपयांच्या बनावट नोटा आणि त्यावर खऱ्या 20 हजार रुपयांच्या नोटा ठेवून पैशांची बॅग तयार केली.
सातारा महामार्गावरील तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये पैसे देण्याचे ठरले. दोघींनी बॅग स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. सविता शिंदे आणि गौरी पंडित यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोनाली शिंदे पसार असून पोलिस तिचा शोध घेत आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जाधव यांची एका महिलेशी ओळख झाल्यानंतर फोनवरून संवाद आणि व्हिडीओ कॉल सुरू झाले. पुढे भेटीगाठीही वाढल्या. या भेटींचे चित्रीकरण संबंधित महिलेने पर्समध्ये लपवलेल्या छुप्या कॅमेऱ्याद्वारे केल्याचा संशय आहे. त्यानंतर या चित्रीकरणाचा आधार घेत जाधव यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात झाली. या प्रकरणातील सविता शिंदे आणि सोनाली शिंदे या महिला राजकीय क्षेत्राशी संबंधित असून त्यापैकी एका महिलेकडे राजकीय पद असल्याची माहिती आहे. या कथित हनी ट्रॅप प्रकरणाचा पुढील तपास सातारा तालुका पोलीस करीत आहेत.