![]()
गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी २०२६-२७ आणि २०२७-२८ या दोन आर्थिक वर्षांतील निवासी पाणीपट्टी व घनकचरा कराची आकारणी करू नये, अशी मागणी माजी नगरसेवक रावसाहेब बाबासाहेब मनगिरे यांनी बार्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी वाहिद शेख, ॲड. राजश्री डमरे, गिरीश बरीदे व बापू कदम उपस्थित होते. या निवेदनात निवासी मिळकतींवरील वार्षिक २ हजार ५०० रुपये पाणीपट्टी आणि ९०० रुपये घनकचरा कर असे एकूण ३,४०० रुपये दोन वर्षांसाठी माफ करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले की, स्वातंत्र्यानंतर प्रथमच यंदा अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचाही त्यामध्ये समावेश आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि दुष्काळी मदतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून त्याचा परिणाम शहरातील व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांवरही झाला आहे. त्यामुळे दोन वर्षांसाठी या करातून नागरिकांना दिलासा द्यावा असे मनगिरे यांनी म्हटले आहे. बार्शी नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी या दोन वर्षांच्या करमाफीपोटी निर्माण होणारी अंदाजे ३ हजार ४०० रुपयांची वार्षिक तूट भरून काढण्यासाठी शासनाकडे विशेष अनुदानाची मागणी करावी अशी सूचनाही केली आहे.या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांना दिल्या आहेत. मंजुरीसाठी विशेष सभा घ्या राज्यातील काही नगरपालिकांनी यापूर्वी अशा प्रकारे पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिल्याचा संदर्भ देत बार्शी नगरपरिषदेनेही विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी. नगरपरिषदेच्या सभेच्या विषयपत्रिकेवर हा विषय घेऊन महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियमातील कलम ८१(४) नुसार प्रस्ताव मांडावा व सभागृहाची मंजुरी घेऊन दोन वर्षांची पाणीपट्टी व घनकचरा करमाफी लागू करावी अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.
Source link
दोन वर्षांची पाणीपट्टी व घनकचरा कर माफ करा:नगरसेवक मनगिरे यांची नगरपरिषदेकडे मागणी