![]()
शहरात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना १३ दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे. मात्र जलतरण तलावात २०० टँकरने १० लाख लिटर पाणी टाकण्यात आले. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. मनपातील गट नेते नीलेष देव यांनी बुधवारी जिल्हाधिकारी, आयुक्तांकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. तसेच त्यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यातही तक्रार दिली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सांस्कृतिक भवन, जलतरण तलावाची सुविधा निर्माण होत आहे. या विकासकामांचे आपण स्वागत करतो. मात्र शहरात पाणीटंचाई असताना नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले जाते. दुसरीकडे जलतरण तलावासाठी टँकरने पाणी भरण्यात येते. हा विषय प्रशासनाने स्पष्ट करावा, असे गट नेते देव यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बांधकामासाठी एसटीपी प्रक्रियेद्वारे शुद्ध केलेले पाणी वापरण्याचे निर्देश दिले आहेत. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. मग जलतरण तलावासाठी पाणी कोणत्या स्रोतामधून आणले? किती टँकर वापरण्यात आले? पाणी भरण्याची परवानगी कोणी दिली? याची सविस्तर माहिती प्रशासनाने जनतेसमोर मांडावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या दोन दिवसांत २०० टँकरने १० लाख लिटर पाणी जलतरण तलावात ७०० टँकरद्वारे पाणी ओतण्याचा आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहे, देव यांचे म्हणणे आहे. याप्रकरणाची आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, अधिनियम २००९ मधील लागू तरतुदींच्या अनुषंगाने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Source link
जलतरण तलावात ओतले 200 टँकर; नागरिकांना पाणी मिळेना:वंचितची जिल्हाधिकारी, आयुक्तांकडे तक्रार, चौकशीची मागणी