Headlines

चार महिने महिलांची आहारसेवा; पुरुषांनी अनुभवले सेवेचे महत्त्व:10 ते 70 वर्षांच्या 35 श्रावकांनी सोवळ्यात केला स्वयंपाक




आर्यिका १०५ श्री प्रतिभामती माताजी ससंघ यांच्या मंगल सान्निध्यात करमाळा येथे पार पडलेल्या चातुर्मासात अनेक धार्मिक आणि संस्कारक्षम उपक्रम राबविण्यात आले. यातील पुरुष श्रावकांनी केलेला एक आगळावेगळा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. चातुर्मासाच्या चार महिन्यांत महिलांनी दररोज श्रद्धेने आणि भक्तिभावाने माताजींच्या आहाराची सेवा केली. त्यांच्या या अखंड सेवेला मानवंदना देण्यासाठी पुरुष श्रावकांनी एका दिवसाची आहारसेवा स्वतः सांभाळली. या उपक्रमात जवळपास ३५ पुरुष श्रावक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, यामध्ये १० वर्षांच्या लहान मुलांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठांचाही समावेश होता. सर्वांनी एकत्र येत धार्मिक नियमांचे पालन करून सोवळ्यात चौका लावला आणि माताजींच्या आहाराची संपूर्ण तयारी केली. चौका लावण्यापासून ते स्वयंपाक पूर्ण करण्यापर्यंत प्रत्येक काम सर्वांनी भक्तिभावाने आणि काळजीपूर्वक केले. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी झालेल्या जवळपास सर्वच पुरुषांसाठी हा पहिलाच अनुभव होता. नेहमी महिलांकडून केली जाणारी आहारसेवा स्वतः करताना त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. स्वयंपाक करताना स्वच्छता, वेळेचे नियोजन, शिस्त आणि प्रत्येक गोष्टीची घ्यावी लागणारी काळजी याची प्रत्यक्ष जाणीव झाली. महिलांनी चार महिने निष्ठेने केलेल्या आहारसेवेचा सन्मान पुरुषांनी एका दिवसाची सेवा करून केला. हा उपक्रम केवळ स्वयंपाक करण्यापुरता मर्यादित न राहता महिलांच्या कामाचा आदर, एकमेकांच्या कष्टांची जाणीव आणि धार्मिक संस्कारांची शिकवण देणारा ठरला. विशेष म्हणजे, लहान मुले आणि ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन केलेल्या या सेवेमुळे पुढच्या पिढीलाही सेवाभावाचे संस्कार मिळाले. करमाळा चातुर्मासातील हा अनोखा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आणि कायम स्मरणात राहणारा ठरला. या उपक्रमातून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देतानाच सेवा, समर्पण आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ झाली असून, करमाळ्यातील या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सेवेतून चार महिन्यांच्या कष्टांची जाणीव! करमाळा चातुर्मासात ३५ पुरुष श्रावकांनी एकत्र येत माताजींच्या आहाराची सेवा केली. यामध्ये १० वर्षांच्या बालकापासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वजण सहभागी झाले. सर्वांनी सोवळ्यात चौका लावून स्वयंपाकापासून आहार तयार करण्यापर्यंतची सर्व कामे भक्तिभावाने केली. विशेष म्हणजे, बहुतांश पुरुषांचा हा पहिलाच अनुभव होता. महिलांनी चार महिने केलेल्या आहारसेवेतील कष्टांची जाणीव या एका दिवसाच्या सेवेतून झाली. प. पू. प्रतिभामती माताजींनीही सर्वांचे कौतुक केले. महिलांच्या निःस्वार्थ सेवेला पुरुषांनी दिलेली ही अनोखी मानवंदना ठरली. या पुरुषांनी पहिल्यांदाच केला स्वयंपाक चार महिने महिला दररोज ही सेवा कशा पद्धतीने करतात, त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते आणि किती वेळ द्यावा लागतो, याचा अनुभव पुरुष श्रावकांना या एका दिवसात आला. या पुरुषांनी पहिल्यांचा हा अनुभव घेतला. घरातील महिलांकडून रोज केली जाणारी कामे अनेकदा सहज वाटतात; मात्र ती स्वतः करून पाहिल्यानंतर त्यामागचे कष्ट समजतात, याची जाणीव या उपक्रमातून झाली. महिलांनी चार महिने केलेल्या आहारसेवेतील कष्टांची जाणीव या एका दिवसाच्या सेवेतून झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *