Headlines

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा:20 लाख शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहन अनुदान, दुष्काळावरही दिले महत्त्वाचे अपडेट




राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. नियमितपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या 20 लाख शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहन अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांना मिळणारी मदत, जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन आणि वीजपुरवठा यावरही त्यांनी भूमिका मांडली. नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. 20 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणार राज्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याच्या मुद्द्यावर बोलताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली. राज्यातील सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना लवकरच प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे त्यांच्या विधानातून स्पष्ट झाले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचनामे सुरू राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, नाशिक जिल्ह्यातील आणखी काही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याची मागणी होत आहे. याबाबत बोलताना भरणे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील 14 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश आहे. उर्वरित भागांनाही मदत मिळावी, यासाठी मागण्यांचा विचार केला जात आहे. सध्या कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून पंचनाम्यांचे काम सुरू आहे. या कामाचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंतचा अहवाल सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असून, आवश्यक दुरुस्त्या करून सुधारित प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, केंद्र सरकारकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा न करता राज्य सरकारने शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, त्यांनाही लवकरच मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहनही कृषिमंत्र्यांनी केले. जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन, मोफत बियाणेही देणार दुष्काळाच्या परिस्थितीत केवळ शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा विचार करून चालणार नाही, तर पशुधनाच्या चाऱ्याची उपलब्धताही महत्त्वाची आहे. दुष्काळाचा फटका बसल्यानंतर शेतकरी आणि पशुधनाला कमीत कमी त्रास व्हावा, यासाठी सरकारकडून नियोजन केले जात असल्याचे भरणे यांनी सांगितले. जनावरांना चारा कमी पडू नये, यासाठी आवश्यक उपाययोजनांचा विचार करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याची योजनाही राबवली जात आहे. दुष्काळ हे मोठे संकट असून, त्याचा सामना करण्यासाठी सर्व विभागांना समन्वयाने काम करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना 24 तास वीज देणे शक्य नाही शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्याच्या प्रश्नावरही दत्तात्रय भरणे यांनी भाष्य केले. शेतकऱ्यांना 24 तास वीजपुरवठा करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, वीजपुरवठ्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना किंवा इतर घटकांना त्रास होणार नाही, याची काळजी महावितरणने घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. राज्यातील सुमारे 30 लाख शेतकरी 2 लाख रुपयांच्या आतील कर्जाच्या गटात असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन सरकारकडून विविध स्तरांवर उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रिया सुळे यांच्या टीकेला भरणेंचे प्रत्युत्तर दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेवरही दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी असल्याचे सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून लक्ष देत असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण राज्यातील परिस्थितीवर लक्ष आहे, तर सुनेत्रा वहिनी पुणे जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अजितदादांचा पुणे हा जिल्हा असून, तेथील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी झाली पाहिजे, असे भरणे म्हणाले. सुप्रिया सुळे यांच्या टीकेमागे तसा उद्देश नसेल, असे सांगतानाच त्यांनी दोन्ही महिला एकाच कुटुंबातील असल्याचा उल्लेख केला. सुनेत्रा पवार या खंबीर असून, त्यांनी अजित पवार यांच्या कामाचा अनुभव घेतला आहे. त्या चांगले काम करत आहेत, अशा शब्दांत भरणे यांनी त्यांची पाठराखण केली. हेही वाचा….. राज्यात ‘चोर-पोलीस मौसेरे भाई’ अशी स्थिती:अपयशी गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा; कुंभमेळ्यात 36000 कोटींचा भ्रष्टाचार -हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल
राज्यातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, वाढता भ्रष्टाचार आणि संविधान दिनाचे औचित्य साधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी (26 नोव्हेंबर) ठाण्यातून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला. “गेल्या 2 महिन्यांत मुंबई, पुणे, ठाणे आणि चिपळूणमध्ये गोळीबार व भरदिवसा हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. कधीकाळी जगात नावाजलेल्या मुंबई पोलिसांचा आज धाक उरलेला नाही; राज्यात ‘चोर-चोर मौसेरे भाई’ म्हणजेच गुंड आणि पोलिसांचे संगनमत झाले आहे. गृहखाते पूर्णपणे अपयशी ठरले असून विद्यमान गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा,” अशी आक्रमक मागणी सपकाळ यांनी केली. यावेळी त्यांनी कुंभमेळा नगरीतील 36000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत डिलिमिटेशन विधेयकाला काँग्रेस आणि संपूर्ण ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचा कडाडून विरोध असल्याचे स्पष्ट केले. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *