![]()
कामगारांच्या हक्कांसाठीची चळवळ राजकारणापासून दूर ठेवावी आणि कामगारांनी एकजुटीने लढा द्यावा, असे गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये कामगार कार्यकर्ते आणि गुणवंत कामगारांच्या मेळाव्यात त्या बोलत
.
कामगारांच्या न्याय्य हक्कांसह आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी अनेक उद्योगांमध्ये कामगार संघटना लढा देतात. संघटन आणि नेतृत्व सक्षम असेल, तर कामगार संघटनांना यश मिळते. मात्र, लढ्यात राजकारण आले तर कामगार चळवळ संपुष्टात येते, असे चव्हाण म्हणाल्या.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे मगर स्टेडियमच्या मोबदल्यात हस्तांतरित झालेल्या भूखंडाच्या विकासावर चर्चा करण्यासाठी खराळवाडी, पिंपरी येथे हा मेळावा आयोजित केला होता. गुणवंत कामगार कल्याण मंडळ, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने अल्फा लावल संघटनेचे अध्यक्ष आणि प्रमुख निमंत्रक किरण देशमुख यांनी मेळाव्याचे आयोजन केले.
मेळाव्यात मंडळाचे कोषाध्यक्ष महंमद शरीफ मुलाणी, सचिव राजेश हजारे, कार्याध्यक्ष तानाजी एकोंडे, बाळासाहेब साळुंके, भरत शिंदे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, प्रकाश यादव, शंकर नाणेकर, दीपक पवार, शिवाजी वलवणकर, आकाश पालकर, विजय बडगुजर, सुरेश शिंदे, प्रकाश हुंबे आणि मुस्तफा मुलाणी यांच्यासह युनियन प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.
स्व. आण्णासाहेब मगर स्टेडियमशी संबंधित ३४ वर्षांच्या संघर्षाचा आणि इतिहासाचा उल्लेख करत चव्हाण म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला दिलेल्या भूखंडावर सांस्कृतिक भवन उभारण्याचे नियोजन आहे. त्यासाठी गुणवंत कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र राज्य सातत्याने प्रयत्न करत आहे.
कामगारांच्या घामातून उभारलेल्या स्व. आण्णासाहेब मगर स्टेडियमसारख्या योजनांचा लाभ कामगारांना मिळणे हा त्यांचा हक्क आहे. कामगारांच्या हिताचा विचार होत नसल्याचे दिसते. यशस्वी होण्यासाठी कामगारांनी एकजुटीने आणि राजकारणापासून दूर राहून लढा द्यावा, असे चव्हाण यांनी सांगितले.