Headlines

860 खासदार आणून लोकशाही संपवण्याचा डाव: 150 कोटींचा ‘नॅशनल हॉर्स ट्रेडिंग स्टॉक एक्सचेंज’ उघडलाय; डिलिमिटेशनवरून संजय राऊतांचा हल्लाबोल


केंद्र सरकारने आणलेल्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि या विधेयकाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असले

.

पराभूत झालेले विधेयक 150 कोटींच्या घोडेबाजारातून पुन्हा आणले जातेय

डिलिमिटेशन विधेयकाच्या माध्यमातून भाजप देशाची संघराज्य (फेडरल) रचना उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी भाजपच्या निवडणूक विजयांचा पाढा वाचला. भाजपने आजवर एकही निवडणूक गुणवत्तेवर (मेरिट) किंवा जनतेच्या खऱ्या मतदानावर जिंकलेली नाही. 2014 मध्ये खात्यात 15 लाख रुपये देण्याचे खोटे आश्वासन देऊन जनतेची फसवणूक केली; त्यानंतर ईव्हीएम (EVM) घोटाळा, मतचोरी आणि सीट चोरी केली. विरोधी पक्षांनी हे सर्व उघड केल्यानंतर आता 2029 चा विजय निश्चित करण्यासाठी मनाप्रमाणे 860 मतदारसंघ निर्माण करण्याचे कारस्थान रचले आहे.

50 खोक्यांनंतर आता 150 खोक्यांच्या घोषणा घुमणार

100 दिवसांपूर्वी हेच विधेयक लोकसभेत आले असता विरोधकांनी ते मोठ्या मताधिक्याने पराभूत केले होते. आता अमित शाह पुन्हा तेच विधेयक आणत असून त्यासाठी 150 कोटी रुपयांचा घोडेबाजार सुरू आहे. महाराष्ट्रातील जे खासदार या देशविरोधी व महाराष्ट्रविरोधी विधेयकाला मतदान करतील, त्यांच्याविरोधात आता 50 खोक्यांऐवजी ‘150 खोके’ अशा घोषणा दिल्या जातील आणि त्यापैकी एकही खासदार पुन्हा निवडून येणार नाही.

पवारांच्या सहकाऱ्यांनी सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवला

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका घेणाऱ्या शरद पवार गटाच्या नेत्यांचा संजय राऊत यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत समाचार घेतला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ असून ते सध्या कोणताही निर्णय घेण्याच्या शारीरिक व मानसिक स्थितीत नाहीत. त्यांनी गेल्या 60 वर्षांत राजकारणात व समाजकारणात उभी केलेली उत्तुंग झेप त्यांच्याच सहकाऱ्यांनी त्यांच्या हयातीत नष्ट करण्याचा विडा उचलला आहे. ज्या सहकाऱ्यांना पवारांनी मोठे केले आणि सर्वोच्च पदे दिली, त्यांनी सत्तेच्या भुकेपोटी त्यांच्या विचारांची माती खाल्ली आहे.

यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर पुष्पचक्र वाहू नका

महाविकास आघाडीच्या (काँग्रेस व शिवसेना) ताकदीमुळेच तुमचे 8 खासदार निवडून आले आणि त्यातील 5 ठिकाणी भाजपचा पराभव झाला; खुद्द शरद पवारांना राज्यसभेत निवडून आणण्यासाठीही मी पुढाकार घेतला होता, हे सुप्रिया सुळे यांना चांगलेच माहीत आहे. आज त्याच भाजपच्या व अमित शाहांच्या चरणाशी जाऊन बसणे हा महाराष्ट्राशी केलेला द्रोह आहे. यापुढे या नेत्यांनी फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊ नये आणि कराडच्या प्रीतिसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांना पुष्पचक्र वाहू नये.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची आधी माफी मागा

ज्या अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा पक्ष आणि कुटुंब फोडले, ज्यांच्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना तुरुंगात जावे लागले, त्यांच्याच हाताला हात मिळवण्याआधी या नेत्यांनी देशमुख आणि मलिक यांची माफी मागावी. आगामी ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे खासदार कोणत्या तोंडाने जाणार? त्यांना ना भाजपमध्ये स्थान उरेल, ना महाविकास आघाडीत, असा इशारा राऊत यांनी दिला.

आमचे 7 खासदार फुटले तरी आम्ही मोदी-शाहांच्या पायाशी गेलो नाही

पक्ष फुटण्याच्या भीतीपोटी हा निर्णय घेतला जात असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनी शिवसेनेचे उदाहरण देत सडेतोड उत्तर दिले:

पक्षापेक्षा देश आणि विचारधारा महत्त्वाची

पक्ष फुटेल हे भय कोणाला दाखवता? याच डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा मिळावा म्हणून आमचा पक्ष फोडला गेला आणि आमचे 7 खासदार फोडण्यात आले; तरीही आम्ही अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यांच्या पायाशी गेलो नाही, तर आजही ताठ मानेने लढत आहोत. आमदार-खासदार येतील आणि जातील, पण देश व महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. तुमचे खासदार फुटत असतील तर त्यांच्याकडून राजीनामे घ्या; पण महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसू नका, असे राऊत यांनी सुनावले.

ज्ञानेश कुमार व मोदी-शहा आकाशातून पडलेले नाहीत

ज्या ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात सर्वाधिक मोर्चे निघाले, त्यांनाच या आयोगाचे प्रमुख करण्यात आले आहे. या देशाने रामायण, महाभारत, स्वातंत्र्यलढा आणि जयप्रकाश नारायण यांचा संघर्ष पाहिला आहे; कोणीही अमरपट्टा घेऊन आलेले नाही. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक ‘धारावी बचाव’ मोर्चा निघत आहे. अख्खी मुंबई आणि महाराष्ट्र गौतम अदानींच्या घशात घालण्याचा घाट घातला जात आहे; धारावीतील कष्टकरी व गोरगरीब मराठी माणसाने काय यांची भांडी घासायची का? मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले होते, त्यामुळे मुंबई आणि मराठी माणसाचा स्वाभिमान वाचवण्यासाठी हा लढा सुरूच राहील, असा निर्धारही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

——————————————————-

हेही वाचा…

राधाकृष्ण विखे पाटलांचा काँग्रेसवर हल्लाबोल: म्हणाले- सत्ता नाही म्हणून काँग्रेसचा डिलिमिटेशनला विरोध, इंडिया आघाडीतील फूट अटळ होती

परिसीमन विधेयकाच्या निमित्ताने इंडिया आघाडीमध्ये निर्माण झालेले मतभेद आणि शरद पवार गटाने बैठकीकडे फिरवलेली पाठ, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. “डिलिमिटेशन हा देशाच्या हिताचा चांगला निर्णय असून, केवळ सत्ता नाही म्हणून काँग्रेस विरोधासाठी विरोध करत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील ही फूट अटळ होती,” असा घणाघात विखे पाटील यांनी केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.