केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात पुन्हा आणलेल्या डिलिमिटेशन (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयकावरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (28 नोव्हेंबर) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक आरो
.
“एप्रिल महिन्यात संसदेत पराभूत झालेले डिलिमिटेशन विधेयक नोव्हेंबरमध्ये अचानक पुन्हा का आणले जात आहे? यामागे चीन आणि पाकिस्तानची ब्लॅकमेलिंग आहे. जून-जुलैमध्ये कोलंबो येथे झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या (ISI) अधिकाऱ्यांनी आरएसएस व भाजपचे नेते राम माधव यांच्यासमोर 26/11 च्या मुंबई हल्ल्यातील करकरे-कामटेंच्या शरीरातील गोळ्यांचे सत्य आणि हल्ल्यामागील भूमिका उघड करण्याची धमकी दिली आहे,” असा सनसनाटी दावा आंबेडकर यांनी केला.
तसेच, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 1990 पासूनच दाऊद इब्राहिमच्या ताब्यात असल्याचा पुनरुच्चार करत, डीएमके (DMK) आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने हे देश तोडणारे विधेयक संसदेत हाणून पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोलंबोतील बैठकीत आयएसआयने राम माधव यांना ब्लॅकमेल केले
एप्रिलमध्ये नामंजूर झालेले डिलिमिटेशन विधेयक नोव्हेंबरमध्ये पुन्हा आणण्यामागे आंतरराष्ट्रीय दबावतंत्र असल्याचा गंभीर आरोप ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. चीनने अरुणाचल प्रदेशात 200 किलोमीटर आतपर्यंत अतिक्रमण केले असून अक्साई चीन हा आपलाच भाग असल्याचे जाहीर केले आहे. तसेच ईशान्य भारतातील ‘सेव्हन सिस्टर्स’ राज्यांची जीवनवाहिनी असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीवर चीन 60 गिगावॅट वीजनिर्मितीचे धरण बांधून पाणी अडवत आहे; जेणेकरून पाणी हवे असल्यास चीनसोबत या, अशी धमकी ईशान्येकडील राज्यांना दिली जाईल.

कोलंबो परिषदेतील गोपनीय धमकी
लंडन मुख्यालय असलेल्या ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज’ने जून-जुलैमध्ये कोलंबो येथे परिषद बोलावली होती. त्यात भारताचे माजी लष्करप्रमुख नरवणे व सरकारी अधिकाऱ्यांसह पाकिस्तानच्या आयएसआयचे प्रमुख शेरी रहमान, सय्यद हैदर खान, अली खान पटौदी उपस्थित होते. कोणतेही सरकारी किंवा राजनैतिक पद नसतानाही राम माधव तिथे उपस्थित होते आणि त्यांनी नंतर मोहन भागवत व सरकारला माहिती दिली. या बैठकीत राम माधव यांना थेट धमकावण्यात आले की, “तुम्ही डिलिमिटेशन विधेयक पुन्हा आणणार आहात की नाही? नसल्यास मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे आणि अशोक कामटे यांच्या शरीरातून नेमक्या कोणत्या गोळ्या निघाल्या—ज्याचा उल्लेख उज्ज्वल निकम यांनी चालवलेल्या खटल्यातही नाही—ती माहिती आणि मुंबई हल्ल्यामागील खरा रोल आम्ही जगासमोर आणू.” पूर्वी अमेरिका भारताला ब्लॅकमेल करत होती, आता चीन आणि पाकिस्तान मिळून सरकारला ब्लॅकमेल करत आहेत.
शरद पवारांचा पक्ष दाऊद इब्राहिमच्या ताब्यात
डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाच्या पाठिंब्यावरून ॲड. आंबेडकर यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला. लोकसभेत बहुमत नसताना हे विधेयक कसे मंजूर होणार, असा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा “राष्ट्रवादीची (एनसीपी) चिंता करू नका, ते तुमच्यासोबत येतीलच” असे सांगण्यात आले. आज शरद पवार यांचा पक्ष दाऊद इब्राहिमच्या ताब्यात असून दाऊदनेच भाजपला पाठिंबा देण्याचा निरोप दिला आहे. शरद पवार हे पूर्णपणे दाऊद इब्राहिमचे ‘कॅप्टिव्ह’ (ओलिस) असल्याचा आरोप मी 1990 पासून करत आलो आहे; तेव्हा मी आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मुंबई बॉम्बस्फोटानंतर ही बाब मांडली होती, मात्र कोणीही ऐकले नाही.
पुण्यातून डिफेन्सच्या विमानाने बॉम्बस्फोटाचा आरोपी गेला
पुण्यातील लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवू नये; पुण्यातूनच डिफेन्सच्या विमानाने बॉम्बस्फोटाच्या आरोपीला नेण्यात आले होते, असा गंभीर उल्लेख करत आंबेडकरांनी अंधभक्तीमुळे देश धोक्यात येत असल्याचा इशारा दिला.
उत्तर भारताचे उत्पन्न 12 लाख कोटी तर दक्षिण भारताचे 22 लाख कोटी
डिलिमिटेशन विधेयकामुळे देशात उत्तर विरुद्ध दक्षिण असा नवा संघर्ष पेटेल आणि देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल, असे स्पष्ट गणित प्रकाश आंबेडकर यांनी मांडले. उत्पन्नाचा विचार केल्यास उत्तर भारतातील राज्यांचे एकूण उत्पन्न 12 लाख कोटी रुपये आहे, तर दक्षिण भारतातील राज्यांचे उत्पन्न तब्बल 22 लाख कोटी रुपये (दुप्पट) आहे. कॉर्पोरेट जगाचा आणि काहींचा डोळा दक्षिण भारतातील या 22 लाख कोटींच्या बाजारपेठेवर आहे.
लोकसंख्या नियंत्रणाची शिक्षा दक्षिण भारताला
माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या ‘हम दो हमारे दो’ आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे दक्षिण भारतातील लोकसंख्या उत्तर भारताच्या तुलनेत 20 ते 22 टक्क्यांनी कमी झाली. जर लोकसंख्येच्या आधारे जागा वाढवल्या, तर 50 टक्के जागा वाढवण्याच्या गप्पा मारल्या तरी तामिळनाडूच्या सध्याच्या 39 जागा कमी होऊन केवळ 33 जागांवर येतील, तर उत्तर भारताच्या जागा प्रचंड वाढतील. यामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आपण वेगळे पडल्याची भावना निर्माण होऊन ती संघर्षाची ठिणगी ठरेल आणि अनेक राज्ये भारतापासून वेगळे होण्याची भाषा करू लागतील.
चंद्राबाबू नायडू आणि डीएमकेने हे विधेयक हाणून पाडावे
सध्या हे विधेयक रोखण्याची ताकद फक्त चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पक्ष (TDP) आणि एम. के. स्टॅलिन यांच्या डीएमके (DMK) पक्षाकडे आहे. डीएमकेचे नेते दयानिधी मारन यांच्या एअरलाईन्स कंपनीच्या (इंडिगो/संबंधित विमान कंपनी) आर्थिक अडचणींवरून सरकार त्यांच्याशी सौदेबाजी करत असल्याची माहिती आहे; मात्र डीएमकेने या दबावाला बळी न पडता मतदानापर्यंत ठाम राहून हे विधेयक मोडून काढावे.
भाजप खासदारांनीही सद्सद्विवेकबुद्धीने विरोध करावा
घटना समितीच्या वेळी भाषेच्या वादावरून दक्षिण भारतातील राज्ये एकत्र राहण्यास तयार नव्हती; तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजी भाषेच्या बाजूने मतदान करून देश एकत्र ठेवला. संसदेने डॉ. राजेंद्र प्रसाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तर-दक्षिण वादावरील चर्चेचे 15 पानांचे एक पुस्तक प्रकाशित केले आहे; सर्व खासदारांनी ते वाचावे आणि भाजपमधील देशप्रेमी खासदारांनीही आरएसएस-भाजपच्या कटाला बळी न पडता या विधेयकाला विरोध करावा, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
———————————————————————————–
हेही वाचा…
डिलिमिटेशनला माझा पाठिंबा: मात्र प्रक्रिया सर्वसंमतीने व्हायला हवी- सुशीलकुमार शिंदे

डिलिमिटेशन विधेयकावरून देशभरात आणि राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस पक्षाने या विधेयकाला विरोध केला असला, तरी वाढत्या लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व मिळण्यासाठी डिलिमिटेशन होणे गरजेचे आहे, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मात्र, ही प्रक्रिया सर्व संमतीने झाली असती तर अधिक चांगले झाले असते, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. येथे वाचा संपूर्ण बातमी