![]()
पुण्यात तिसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. अधिकाऱ्यांनी कामातील अनुभव आणि विनोदी प्रसंग पुस्तके व परिसंवादातून मांडावेत, असे महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले.
.
नियम आणि व्यवहार्यतेचा समन्वय साधून अधिकारी व लोकप्रतिनिधींनी काम केल्यास प्रकल्प यशस्वी होतात, असे नागपुरे म्हणाल्या. प्रशासनाच्या कामात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या दोघांचीही भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, पुणे महानगरपालिका, यशदा आणि संवाद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलन आयोजित केले आहे. बालगंधर्व रंगमंदिरात दोन दिवस हे संमेलन होणार आहे.
उद्घाटनाला उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, महावितरणचे मानव संसाधन संचालक राजेंद्र पवार, यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, समन्वयक राजीव नंदकर आणि महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी ॲड. निशा चव्हाण उपस्थित होते.
संमेलनानिमित्त शासकीय अधिकाऱ्यांची चित्रे, छायाचित्रे आणि पुस्तके यांचे प्रदर्शन कलादालनात भरवले आहे. संमेलनाच्या संकेतस्थळाचे आणि ‘साहित्यरंग’ स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले.
अधिकाऱ्यांनी फाईल्स आणि नियमांपुरते मर्यादित न राहता लेखन व संवादातून आपली बाजू मांडणे कौतुकास्पद आहे, असे नागपुरे म्हणाल्या. दैनंदिन कामाचा ताण, बैठकांचे वेळापत्रक आणि विविध मागण्या व तक्रारी हाताळताना अधिकाऱ्यांना संयम ठेवावा लागतो, असेही त्यांनी सांगितले. कामातील विनोद आणि अनुभवांवरचे परिसंवाद व कार्यक्रम नियमित व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी चळवळीपासून उपमहापौर पदापर्यंतचा प्रवास सांगितला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त सत्यशोधकांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभे राहावे आणि संविधानाच्या मूल्यांचे जतन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानून आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी दहाव्या क्रमांकावर, तर देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. मराठी, तमिळ आणि बंगाली साहित्याला समृद्ध वारसा लाभला आहे. मातृभाषेतून शिक्षण आणि व्यक्त होण्याचे माध्यम यांचे महत्त्वही त्यांनी सांगितले.