![]()
कोल्हापूरच्या शिरोली पुलाची येथील एका गुन्हेगाराने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले असून, अत्याचाराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या गैबीसाहेब दस्तगीर लिंगरे (वय 42) याने पीडित महिलेला पुन्हा गाठून तिचा विनयभंग केला आणि तिला धर्मांतरासाठी धमकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या खळबळजनक घटनेची गांभीर्याने दखल घेत शाहूपुरी पोलिसांनी आरोपीला तत्काळ बेड्या ठोकल्या असून, जामिनावर बाहेर असतानाही त्याने पुन्हा अशा प्रकारे पीडितेला त्रास दिल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. या घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, संशयित आरोपी गैबीसाहेब लिंगरे याच्यावर संबंधित महिलेने यापूर्वीच अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. या गंभीर गुन्ह्याखाली तो कारागृहात होता, मात्र काही दिवसांपूर्वीच त्याची जामिनावर मुक्तता झाली होती. बाहेर येताच त्याने सुधारण्याऐवजी पीडितेला पुन्हा लक्ष्य करण्यास सुरुवात केली आणि तिच्या मनात धडकी भरवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. बुधवारी कोल्हापूर शहरातील महावीर कॉलेज परिसरातून पीडिता जात असताना, लिंगरे याने तिला रस्त्यात अडवून जबरदस्तीने रिक्षात बसवले आणि तिचा विनयभंग केला. “जर तू पुन्हा पोलिसांत गेलीस तर तुला जिवंत मारून टाकीन, पोलिस किंवा हिंदुत्ववादी लोक माझे काहीच वाकडे करू शकत नाहीत,” अशा दर्पोक्ती करत त्याने पीडितेला धमकावले. जामिनावर बाहेर असलेल्या आरोपीने अशा प्रकारे कायद्याचे भय बाळगता पुन्हा गुन्हा केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप पीडित महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित करून संशयित आरोपी तिच्यावर धर्मांतरासाठी सतत दबाव टाकत असल्याचा धक्कादायक आरोप केला असून, आपल्याला होत असलेल्या असह्य मानसिक त्रासामुळे “हा आपला शेवटचा व्हिडिओ असू शकतो”, अशी भीतीही व्यक्त केली आहे. या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेने केली असून, या खळबळजनक व्हिडिओमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक पीडित महिलेने घडलेला सर्व प्रकार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने पीडितेसह शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले, जिथे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपी गैबीसाहेब लिंगरेला अटक केली आहे. मात्र, शिरोली पुलाची परिसरात अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Source link
कोल्हापुरात संताप!:जामिनावर सुटताच नराधमाने पीडितेला पुन्हा गाठले, धर्मांतराची धमकी देत विनयभंग; आरोपीला अटक