Headlines

सिल्लोड तालुक्यात उष्णतेची लाट; उपजिल्हा रुग्णालयात 4 बेड राखीव, दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला‎




सिल्लोड सध्या वातावरणातील बदलांमुळे पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत आहे. मार्च महिन्यापासूनच राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चढलेला पाहायला मिळत आहे. आगामी काळात उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि खबरदारी बाळगावी, असे आवाहन सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश विसपुते यांनी केले आहे. सध्या सिल्लोड तालुक्यातील उष्णतेची लाट लक्षात घेता येथील उपजिल्हा रुग्णालयात ४ बेड राखीव ठेवण्यात आले. आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ अंश सेल्सियसने जास्त असेल किंवा सलग दोन दिवस तापमान ४५ अंश सेल्सियसच्या पुढे गेल्यास त्या भागात “उष्णतेची लाट आली असे संबोधले जाते. उन्हाळ्याच्या काळात “सन बर्न”, “हिट क्रॅम्प्स” (स्नायूंना गोळे येणे), “हिट एक्झोर्शन” (प्रचंड थकवा) आणि “हिट स्ट्रोक” (उष्माघात) यासारखे आजार उद्भवू शकतात. एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास झाल्यास, त्या रुग्णाला तातडीने सावलीत किंवा हवेशीर खोलीत हलवावे. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात किंवा थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे. रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास वेळ न घालवता जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे. राज्यात जारी करण्यात आलेल्या यलो अलर्ट नुसार आरोग्य विभाग उपाययोजना करत आहे. उन्हात कष्टाची कामे करणारे मजूर व शेतकरी. वृद्ध व्यक्ती आणि लहान मुले. गरोदर महिला व स्थूल व्यक्ती. मधुमेह, हृदयविकार असलेले रुग्ण किंवा अपुरी झोप घेणारे लोक तसेच बॉयलरजवळ काम करणारे कामगार. काय करू नये ? शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळा. लहान मुलांना पार्क केलेल्या बंद वाहनात ठेवू नका. मद्यपान, चहा, कॉफी किंवा सॉफ्ट ड्रिंक्स टाळा. अधिक प्रथिनांचे किंवा शिळे अन्न खाऊ नका, अशा सुचना आरोग्य विभागाने दिल्या आहे. उष्णतेच्या लाटेचा इशारा लक्षात घेता सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा सतर्क केली आहे. १ मार्चपासूनच सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन केला. येथे ४ बेड राखीव असून औषधसाठा, पंखे, कुलर आणि थंड पाण्याची सोय उपलब्ध आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती केली जात आहे तसेच रुग्णवाहिकाही सज्ज आहे. उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास घाबरून न जाता शासकीय रुग्णालयात उपचार करून घ्यावे, असे आवाहन डॉ.महेश विसपुते (वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड) यांनी केले. ही आहेत उष्माघाताची लक्षणे किरकोळ लक्षणे : प्रचंड थकवा जाणवणे, ताप येणे, शरीरावर पुरळ उमटणे, चक्कर येणे किंवा हाता-पायांच्या स्नायूंना गोळे येणे. गंभीर लक्षणे : त्वचा गरम व कोरडी पडणे, तीव्र डोकेदुखी, रक्तदाब वाढणे, नाडीचे ठोके वेगवान होणे, मानसिक बेचैनी किंवा बेशुद्धावस्था येणे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *