Headlines

मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश:वीरकर महाराज आश्रमातून ताब्यात; पैशांचा पाऊस पडेल म्हणत फसवणूक




सोलापूर जिल्ह्यात भोंदू बाबांविरोधातील कारवाईचा धडाका सुरू असतानाच आणखी एका स्वयंघोषित महाराजाचा पर्दाफाश झाला आहे. मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाच्या अटकेनंतर आता माढा तालुक्यातील आडेगाव येथील नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर याला टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणूक, जादूटोणा आणि लोकांची दिशाभूल केल्याच्या आरोपांमुळे वीरकर महाराज अडचणीत आला आहे. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी आश्रमावर छापा टाकत वीरकर आणि त्याचा मोठा भाऊ विकास वीरकर यांना झोपेतूनच उचलल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गुरु माऊली वीरकर याने अध्यात्म आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली अनेक लोकांना जाळ्यात ओढले होते. मोठमोठे राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तीही त्यांच्या आश्रमात येत असल्याची चर्चा परिसरात होती. याच प्रभावाचा वापर करून वीरकर याने अनेकांना आर्थिक फायद्याचे आमिष दाखवले. जादूटोणा, भविष्य बदलवणे आणि पैशांचा वर्षाव होईल अशा दाव्यांमुळे अनेक लोक त्याच्या संपर्कात आले होते. मात्र, आता पोलिस तपासात या सर्व गोष्टींच्या माध्यमातून फसवणुकीचा मोठा प्रकार सुरू असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणातील फिर्यादी पंढरपूर तालुक्यातील एक पीडित व्यक्ती आहे. संबंधित व्यक्तीला व्यवसायात मोठा फायदा करून देण्याचे आमिष वीरकरने दाखवले होते. माझ्याकडील कासव घे, तुझ्यावर पैशांचा पाऊस पडेल, असे सांगत त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, व्यवसाय वाढण्याऐवजी संबंधित व्यक्तीवर कर्जाचा डोंगर वाढत गेला. या प्रकरणात आतापर्यंत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. टेंभुर्णी पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत वीरकर विरोधात गुन्हा नोंदवला. पहाटेच्या सुमारास पोलिस पथक आडेगाव येथील आश्रमात दाखल झाले. यावेळी वीरकर आणि त्यांचा भाऊ विकास वीरकर आश्रमात झोपेत होते. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशीसाठी नेले. या कारवाईमुळे आश्रम परिसरात एकच गोंधळ उडाला. अनेक भक्त आश्रमाबाहेर जमा झाले होते. पोलिसांनी मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवत पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात भोंदू बाबांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे अशा प्रकारच्या फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाला अटक झाल्यानंतर आता वीरकरवर कारवाई झाल्याने जिल्ह्यातील तथाकथित अध्यात्मिक गुरूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडे आणखी काही तक्रारी येण्याची शक्यता असून, या प्रकरणात आर्थिक व्यवहारांचीही चौकशी केली जाणार आहे. लोकांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, अशा भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकलेल्या किंवा फसवणूक झालेल्या लोकांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा. लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत आर्थिक लूट करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या पोलिसांकडून वीरकरच्या आश्रमातील व्यवहार, आर्थिक देवाणघेवाण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *