Headlines

एक तरुण 2 तास एकाच ठिकाणी झुलत उभा:पुण्यातील नरपतगिरी भागातील रस्त्यावरील घटना; झोंबी ड्रग्ज घेतल्याचा दावा, पाहा VIDEO




विद्येचे माहेरघर असणारे पुणे सध्या लैंगिक शोषणाच्या विविध घटनांनी चर्चेत आले आहे. त्यातच आता या शहराला अमली पदार्थांचा विळखा पडल्याची दाखला देणारी एक घटना समोर आली आहे. शहरातील नरपतगिरी भागात अमली पदार्थांचे सेवन केलेला एक तरुण तब्बल 2 तास एकाच ठिकाणी झुलत उभा होता. या तरुणाने झोंबी ड्रग्ज घेतल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मुंबई व उपनगरांत काही दिवसांपूर्वी झोंबी ड्रग्ज घेतलेल्या तरुणांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर आता पुणे शहरातही असाच एक प्रकार घडला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुण्यातील नरपतगिरी चौक परिसरात एक तरुण तब्बल 2 तास झोंबीसारख्या सुन्न अवस्थेत उभा होता. सुरुवातीला हा प्रकार एखाद्या रीलसाठी केलेला स्टंट असेल असे सर्वांना वाटले. पण बराच वेळ उलटूनही त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल न दिसल्याने संशय बळावला. काही वेळ गेल्यानंतर त्याने अतिशय विचित्र व अनियंत्रित हालचाली करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा प्रकार झोंबी ड्रग्जच्या नशेतून घडल्याचे सर्वांच्या लक्षात आले. झोंबी ड्रग्जची पुण्यात एन्ट्री झाली आहे का? काही प्रत्यक्षदर्शींनी त्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून तो सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर काही वेळातच तो व्हायरल झाला. अनेकांनी या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी पोलिसांचे अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये झोंबी ड्रग्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घातक अमली पदार्थांमुळे व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक संतुलन बिघडते. संबंधित व्यक्ती बराच वेळ बधीर अवस्थेत राहते, असे सांगितले जाते. पुण्यात वायरल झालेल्या या व्हिडिओनंतर अशाच प्रकारच्या नशेची शहरात एन्ट्री झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या व्हिडिओची पुष्टी अद्याप झाली नाही. संबंधित तरुणाने नेमक्या कोणत्या पदार्थाचे सेवन केले होते? याबाबत पोलिस किंवा आरोग्य विभागाकडूनही कोणती अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र, या घटनेमुळे पुण्यातील तरुणाई वाढत्या नशेच्या विळख्यात अडकत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने शेअर केला जात असून, नागरिकांकडून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *