Headlines

राज ठाकरे आज पुन्हा न्यायालयात हजर राहणार:18 वर्षांपूर्वीच्या रेल्वे आंदोलन प्रकरणात गुन्हा मान्य नसल्याचे स्पष्ट सांगितले होते




मनसेप्रमुख राज ठाकरे आज 2008 मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाच्या सुनावणीसाठी ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत. 18 वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू असून, आजच्या सुनावणीकडे राजकीय वर्तुळासह मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. याआधी डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या सुनावणीत राज ठाकरे यांनी न्यायालयासमोर मला गुन्हा मान्य नाही, असे स्पष्ट सांगितले होते. तसेच न्यायालयीन प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करू, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती. आता पुन्हा एकदा या प्रकरणाची सुनावणी होत असल्याने जुन्या आंदोलनाची चर्चा रंगू लागली आहे. हे संपूर्ण प्रकरण 2008 सालातील रेल्वे भरती आंदोलनाशी संबंधित आहे. त्या काळात रेल्वे भरती प्रक्रियेत परप्रांतीय उमेदवारांना प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. मराठी तरुणांच्या नोकऱ्या हिरावल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत मनसेने राज्यभर आक्रमक आंदोलन छेडले होते. याच पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन झाले आणि काही उत्तर भारतीय उमेदवारांवर हल्ल्याचे प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेदरम्यान रेल्वे मालमत्तेचेही नुकसान झाल्याची नोंद पोलिसांकडून करण्यात आली होती. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणांमुळे परप्रांतीयांविरोधात वातावरण निर्माण झाले आणि हिंसाचाराला प्रोत्साहन मिळाले, असा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात काही मनसैनिकांना अटकही करण्यात आली होती. पुढे न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान राज ठाकरे यांनाही दिलासा मिळाला होता, मात्र खटल्याची सुनावणी सुरूच राहिली. सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी कल्याण न्यायालयात सुरू होती. नंतर हा गुन्हा ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आला. दरम्यानच्या काळात अनेकवेळा आरोपी न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर राज ठाकरे आणि इतर आरोपींविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज दाखल करून हे वॉरंट रद्द करून घेतले होते. त्यानंतर डिसेंबर 2025 मध्ये राज ठाकरे स्वतः न्यायालयात उपस्थित राहिले होते. गेल्या सुनावणीत न्यायालयाने आरोपांविषयी विचारणा केली असता, राज ठाकरे यांनी गुन्हा नाकारला होता. आपण कोणताही बेकायदेशीर प्रकार केलेला नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्याचवेळी न्यायालयीन चौकशी आणि पुढील सुनावण्यांना सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले होते. त्यामुळे आजच्या सुनावणीत पुढील प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा दरम्यान, 2008 मधील हे आंदोलन महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरले होते. मराठी अस्मिता आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा पुढे करत मनसेने त्या काळात आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे पक्षावर टीकाही झाली होती. आता अनेक वर्षांनंतर हेच प्रकरण पुन्हा न्यायालयात चर्चेत आले असून, आजच्या सुनावणीत काय घडते आणि पुढील तारीख काय लागते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *