![]()
हर घर तिरंगा अभियानांतर्गत येथे भाजपने शक्तिप्रदर्शन करत सुमारे २ किमी लांबीची ५००० दुचाकींचा सहभाग असलेली महारॅली काढली. भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्यासह अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी व माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे रॅलीत सहभागी झाले होते. येथील प्रसिद्ध विजय चौकात शहीद वीर माता व वीर पत्नीच्या हस्ते भारतमातेची पूजा करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. सर्वात पुढे भारत मातेची हार घातलेली प्रतिमा लावलेल्या टेम्पो च्या मागे वेगवेगळ्या बुलेटवर आ.सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार राम सातपुते व जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे स्वार होऊन रॅली चे नेतृत्व करीत होते. व त्यामागे मोटार सायकलीना तिरंगा लावलेल्या हजारो मोटारसायकलींवर हजारो तरुण वंदे मातरम्,भारत माता की जय,भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत स्वार झाले होते.मोटार सायकलींचे आवाज,हॉर्न व घोषणांनी परिसर दणाणत होता. रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी सहभागी कार्यकर्त्यांचे स्वागत केले. विशेषतः युवकांचा मोठा सहभाग लक्षवेधी ठरला. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या दुचाकींवर तिरंगा ध्वज लावून देशभक्तीचा संदेश दिला. सुमारे ४५ मिनिटांच्या प्रवासानंतर ही रॅली पुन्हा विजय चौकात आल्यावर घोषणाबाजी होऊन रॅलीची सांगता झाली. या वेळी उपस्थितानी हर घर तिरंगा’ अभियान केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवावा,तसेच राष्ट्रध्वजाचा सन्मान राखत स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घराघरात पोहोचवण्याचे आवाहनही करण्यात आले. यावेळी प्रकाश पाटील,सुजय माने पाटील,हंसराज माने पाटील,ज्योतीदेवी माने पाटील आदी उपस्थित होते. शहरातील विजय चौक, गांधी चौक, सदाभाऊ चौक, महर्षी चौक, प्रतापसिंह चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुने बस स्थानक, जुने पोलीस स्टेशन, शिवापूर पेठ, मारुती मंदिर, नगरपरिषद, शिवसृष्टी किल्ला मार्गे पुन्हा विजय चौक असा रॅलीचा मार्ग होता.या रॅलीतील भारतमातेची प्रतिमा असलेला टेम्पो प्रतापसिंह चौकात असताना शेवटची मोटार सायकल ही सदुभाऊ चौकात असल्याने ही रॅली सुमारे दोन किमी पेक्षा जास्त अतंराची होती.
Source link
अकलूजमध्ये 5000 दुचाकींची तिरंगा रॅली:भाजपचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदारांनी केले रॅलीचे नेतृत्व, तरुणांचा सहभाग लक्षणीय