![]()
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी सोमवारी पूर्व झोन क्रमांक ३ अंतर्गत दस्तूरनगर येथील प्रभाग क्रमांक ८, जोग–स्टेडियम प्रभागाला भेट देत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी अस्वच्छतेवरून अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.प्रभागाच्या नगरसेविका डॉ. अर्चना आत्राम यांच्यासमवेत झालेल्या या पाहणी दौऱ्यात प्रभागातील स्वच्छता, बांधकाम, कचरा संकलन, उद्यान परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणांच्या व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी प्रभागातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित सुविधांची पाहणी केली. यामध्ये शुक्रवार बाजार परिसर, ऑक्सिजन पार्क परिसर तसेच कचरा कलेक्शन कॉम्पॅक्टर स्पॉट यांचा विशेष समावेश होता. बाजार परिसरातील स्वच्छता व्यवस्था, कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता आणि परिसरातील आवश्यक बांधकाम कामांची स्थिती याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने कचरा संकलनाची प्रक्रिया नियमित व शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्याच्या सुचना आयुक्तांनी दिल्या. कचरा कलेक्शन कॉम्पॅक्टर स्पॉटची पाहणी करताना परिसरात कचरा साचणार नाही, नागरिकांना दुर्गंधी किंवा अस्वच्छतेचा त्रास होणार नाही आणि कचऱ्याची वेळेत उचल होईल, याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. शुक्रवार बाजार परिसराची पाहणी करताना बाजारामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, परिसराची नियमित साफसफाई आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याबाबतही आवश्यक सूचना करण्यात आल्या. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य देऊन ती वेळेत पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निर्देश दिले. प्रत्यक्ष पाहणी करून समस्या समजून घेतल्यामुळे संबंधित कामांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यास महानगरपालिका प्रशासनाला मदत होणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. या पाहणी दौऱ्यावेळी सहायक आयुक्त नितीन बोबडे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सेले, उद्यान अधीक्षक बोरकर, ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक कुंदन हडाले, आरोग्य निरीक्षक सुनील चोरपगार, शैलेश डोंगरे तसेच कोणार्क साफसफाई कंत्राटदाराचे प्रतिनिधी धीरज गंगारामानी व आदित्य सुरवाडे उपस्थित होते. आयुक्तांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रभागातील समस्या केवळ कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. स्वच्छता, कचरा संकलन, उद्यान देखभाल आणि बांधकामाशी संबंधित कामांमध्ये नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी विभागांनी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक त्या उपाययोजनांसाठी अधिकाऱ्यांना सूचना दिली.
Source link
जोग स्टेडियम प्रभाग अस्वच्छतेवरून आयुक्तांनी अधिकाऱ्यांना खडसावले:शुक्रवार बाजार, ऑक्सिजन पार्क, कचरा कॉम्पॅक्टर स्पॉटची पाहणी