![]()
कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी जीवनात साधनेची नितांत गरज असते. निरंतर साधनेने कोणत्याही विषयावर प्रभुत्व मिळवता येते आणि भक्तीच्या साधनेने ईश्वराचा कृपाप्रसाद कायमस्वरूपी प्राप्त होतो. भगवान शंकरासारखी कामदेवाला भस्म करण्याची शक्तीही साधनेतूनच मिळते, असे प्रतिपादन प्रसिद्ध प्रवचनकार डॉ. वसुधा देव यांनी केले. रामदास पेठेतील श्रीनाथ दत्त मंदिर संस्थानच्या वतीने श्रावण मासानिमित्त आयोजित ‘शिवमहिम्न स्तोत्र’ प्रवचनमालेच्या तिसऱ्या सत्रात त्या बोलत होत्या. डॉ. देव पुढे म्हणाल्या की, सामान्य मानवी जीवनचक्रात बऱ्या- वाईट कामना सतत वाढत असतात. या कामना आणि लालसा नेहमी दुःखाला कारणीभूत ठरतात. अपेक्षा पूर्ण न झाल्यास क्रोधाचा जन्म होतो आणि क्रोधाने माणसाचे अधःपतन होते. मात्र, आपण शिवतत्त्वाच्या सानिध्यात गेलो की या कामना आपोआप दूर पळतात. आपल्या कामना आणि वासना भगवंतप्राप्तीच्या मार्गावर समर्पित केल्यास प्रभूभक्तीचा मार्ग सुकर होतो. या जीवनप्रवासात सन्मार्ग दाखवणाऱ्या सद्गुरूंची भेट अत्यंत आवश्यक असून सद्गुरूच भक्तांचे कल्याण करतात. शिवतांडवाचे मर्म स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, शिवाचे तांडव हे केवळ क्रोधाचे प्रतीक नसून सृष्टीच्या नवनिर्मितीची प्रक्रिया आहे. जेव्हा सृष्टीला प्रलयाचे ग्रहण लागते आणि पंचमहाभूतांचा प्रलय होतो, त्या विदारक स्थितीला शिवतांडव म्हटले जाते. या प्रलयातूनच नवसृजनाची निर्मिती होते. यावेळी त्यांनी पुष्पदंत रचित शिवमहिम्न स्तोत्राचे दाखले देत गंगावतरणाची कथा सांगितली. भागीरथरूपी सद्गुरूंनी गंगा भूतलावर आणली आणि शंकराच्या मस्तकावरून वाहणाऱ्या गंगेतून सप्तसमुद्र व सप्तधारांची निर्मिती झाली. या सत्रात त्यांनी तारकासूर वध व बाणासुराच्या कथांचे मार्मिक विवेचन केले. बुधवारपर्यंत प्रवचनमाला श्रीनाथ दत्त मंदिर संस्थानमध्ये सुरू असलेली ही शिवमहिम्न स्तोत्र प्रवचनमाला बुधवार, १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दररोज सायंकाळी ७ ते ८ या वेळेत भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Source link
शिवतांडव विनाशाचे नव्हे, तर नवनिर्मितीचे प्रतीक- डॉ. देव:श्रीनाथ दत्त मंदिरात ‘शिवमहिम्न स्तोत्र'' विषयावर मार्गदर्शन