![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे आक्रमक नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ आज संपत असून त्यानिमित्ताने त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या आमदारकीच्या शेवटच्या दिवशी मिटकरी हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावर पोहोचले. याचवेळी त्यांच्या जागी विधान परिषदेची उमेदवारी झिशान सिद्दीकी यांना जाहीर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे मिटकरींच्या या भेटीकडे आणि त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळी अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यासोबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतचे काही जुने फोटोही पोस्ट केले. आपल्या संदेशात त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणूनचा प्रवास आठवत अनेक भावना व्यक्त केल्या. 13 मे 2026 हा माझ्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस आहे. हा केवळ पदाचा शेवट नसून संघर्ष, वादळं आणि शिकवणींनी भरलेल्या एका मोठ्या राजकीय टप्प्याचा शेवट आहे, असे त्यांनी म्हटले. मागील सहा वर्षांत अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागल्याचेही मिटकरी यांनी नमूद केले. टीका, संघर्ष आणि अनेकदा एकटेपणाचा अनुभव आला. मात्र महाराष्ट्रातील जनतेने दिलेला विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ ठरले, असे त्यांनी सांगितले. विधान परिषदेत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी पोस्टमध्ये लिहिले. राजकारणात अनेक वादळं आली, पण प्रत्येक संकटाने मला अधिक मजबूत बनवलं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रवासात अजित पवार यांच्या मार्गदर्शनाची आठवण करताना अमोल मिटकरी अधिक भावूक झाले. दादांनी दिलेल्या संधीमुळे महाराष्ट्राच्या प्रश्नांवर काम करण्याची ताकद मिळाली. त्यांचा विश्वास आणि साथ कायम प्रेरणादायी राहिली, असे त्यांनी म्हटले. पुढे बोलताना आज दादा आपल्यात नाहीत, हे कटू वास्तव आहे. त्यांची अनुपस्थिती ही आयुष्यातील सर्वात मोठी पोकळी आहे, असे सांगत त्यांनी अजित पवारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, 14 मेपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार असल्याचे संकेतही मिटकरी यांनी दिले. हा पुढचा प्रवास अधिक संयमी, अधिक प्रगल्भ आणि महाराष्ट्राच्या मातीत आणखी घट्ट नातं निर्माण करणारा असेल, असे त्यांनी म्हटले. संघर्ष अजून संपलेला नाही, उलट नव्या उमेदीने पुन्हा उभं राहण्याची ही वेळ आहे, असे सांगत त्यांनी समर्थकांचे आभार मानले. ज्यांनी साथ दिली, टीका केली किंवा विरोध केला त्या प्रत्येक अनुभवाने मला घडवलं, असेही त्यांनी लिहिले. मिटकरी यांना पुन्हा संधी न देता सिद्दीकी यांना उमेदवारी दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. मात्र या वेळी अमोल मिटकरी यांना पुन्हा संधी न देता झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.
Source link
आमदारकीच्या शेवटच्या दिवशी अमोल मिटकरी भावूक:अखेरचा दिवस, मिटकरी देवगिरी बंगल्यावर; सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल