![]()
तिवसा तालुक्यात भारत सरकारच्या स्व-जनगणना उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील सुलतानपूर गावाने आपली स्व-जनगणना प्रक्रिया १०० टक्के पूर्ण केली आहे. यामुळे भातकुली तालुक्यानंतर तिवसा तालुक्याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. सुलतानपूर गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अल्पावधीत संपूर्ण माहितीची नोंदणी केली. नागरिकांनी स्वतःहून कुटुंबीयांची माहिती ऑनलाइन व अधिकृत माध्यमातून भरून प्रशासनाला सहकार्य केले. ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली, ज्यामुळे सुलतानपूर गावाचा तालुक्यात आदर्श निर्माण झाला आहे. या यशस्वी उपक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला तिवसा तहसीलदार मयूर कडसे, नायब तहसीलदार आशीष नागरे आणि महसूल विभागाचे अधिकारी नरेंद्र कुरडकर उपस्थित होते. तहसीलदार मयूर कडसे यांनी ग्रामस्थांचे अभिनंदन करत स्व-जनगणना भविष्यातील विकास आराखड्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजनांचे अचूक नियोजन करण्यासाठी लोकसंख्येची अचूक माहिती आवश्यक असते, असेही ते म्हणाले. नायब तहसीलदार आशीष नागरे यांनी नागरिकांना शासनाच्या डिजिटल उपक्रमांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच उर्वरित गावांनीही सुलतानपूरचा आदर्श घेऊन स्व-जनगणना प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले. गावातील युवक, ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी नागरिकांना माहिती भरण्यासाठी विशेष मदत केली. तिवसा तालुक्यातील इतर गावांमध्येही स्व-जनगणना मोहिमेला वेग आला असून, प्रशासनाकडून जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी भातकुली तालुक्यातील बोरखडी खुर्द आणि इस्माइलपूर या गावांनी स्व-जनगणना पूर्ण केली होती. त्यामुळे स्व-जनगणना पूर्ण करणारी जिल्ह्यातील ही पहिली दोन गावे ठरली होती. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आणि तहसीलदार अक्षय मांडवे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. मंडळ अधिकारी संतोष धुर्वे, गौरव सुरपाटणे, ग्राम महसूल अधिकारी व्ही. बी. बिहाडे, व्ही. बी. दहाट, धम्मपाल वानखडे, महसूल सेवक सीमा वानखडे आणि प्रशांत बिरे आदींनीही या कामात परिश्रम घेतले.
Source link
सुलतानपूरची स्व-जनगणना 100% पूर्ण:भातकुलीनंतर तिवसा तालुक्याने जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला