Headlines

शरद पवार स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कसरतीचे धडे:घोडेस्वारी, पोहणे, तलवारबाजीसह कराटे आणि ट्रेकिंगचेही प्रशिक्षण‎




व्यक्तिमत्त्व चांगले करायचे असेल तर सुट्ट्यांचा सदुपयोग करायलाच हवा, या संकल्पनेतून शंभर विद्यार्थ्यांनी घोडेस्वारी, पोहणे, तलवारबाजी, कराटे, ट्रेकिंग आणि व्यायाम तसेच खेळाच्या माध्यमातून आपल्या सुट्टीचा वेळ घालवून प्रशिक्षण पूर्ण केले. निमित्त होते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आयोजित उन्हाळी व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचे. येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलने संस्थापक डॉ. जे. डी. पवार यांच्या संकल्पनेतून व अध्यक्ष शैलेश पवार, प्राचार्य बी. एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांसाठी विशेष उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात शंभर विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. पंधरा दिवसांच्या या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध व्यायाम, कवायतींसोबत विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. आपत्कालीन काळात काय करावे, अपघात झाला तर काय उपाययोजना कराव्यात, कुणालाही मदत करताना नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात यावर प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय स्वतःला अडचणीच्या काळात सुरक्षित ठेवण्यासाठी कराटे अथवा जवळ असलेल्या साधनसामग्रीचा योग्य वापर कसा करावा, याचबरोबर स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करताना कसे वागावे, बोलावे, चालावे, स्वतःचे वर्तन कसे असावे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. प्रशिक्षणात विविध विषयांत प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सेक्रेटरी अनुप पवार, बी. एन. शिंदे, मुख्यध्यापक जे. एल. पटेल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या शिबिरात ५० विद्यार्थी आणि ५० विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. व्यासपीठावर बोलताना अथवा सूत्रसंचालन करताना कसे करावे, गणवेश कसा असावा, मुलाखतीची तयारी कशी करावी, मित्रांची मदत कशी करावी आदी बाबींची माहिती देण्यात आली. आग, पाणी, वारा यासोबतच नैसर्गिक साधनसामग्रीचा योग्य वापर कसा करावा आणि पृथ्वीवरील पर्यावरण संवर्धनासाठी संरक्षणासाठी काय करावे, याचीही माहिती देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *