![]()
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (MES) मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने केलेल्या कथित अनियमिततेप्रकरणी ‘एआयसीटीई’ (AICTE), दिल्लीकडे सबळ पुराव्यासह तक्रार दाखल करण्यात आली आहे. कॉलेजची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली असून, यावर योग्य त
.
युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पुणे विभागीय तंत्र शिक्षण सहसंचालक दत्तात्रय जाधव यांच्याकडे मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने मोडलेल्या नियमांचे सर्व पुरावे सादर करण्यात आले आहेत. पुणे विभागीय डीटीईने (DTE) स्थापन केलेल्या चौकशी समितीच्या अहवालानुसार संबंधित महाविद्यालय किंवा संस्थेवर कोणतीही कारवाई केली जात नाहीये. त्यामुळे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे आणि त्यांचे दुसऱ्या महाविद्यालयात समायोजन करावे, अशी विनंती करणार असल्याचे यादव म्हणाले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या नामांकित संस्थेने इंजिनिअरिंग कॉलेज सुरू करण्यासाठी इमारत बांधलेली नसतानाही कॉलेज सुरू केले. यामुळे एआयसीटीई, राज्य शासन, डॉ. बाबासाहेब तंत्रशास्त्र विद्यापीठ, तंत्र शिक्षण विभाग आणि विद्यार्थी व पालकांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. संस्थेच्या या गैरव्यवहाराची माहिती सुमारे एक महिन्यापूर्वी प्रसार माध्यमांसमोर आणली होती. संस्थेकडून कायदेशीर कारवाई करण्याची धमकी मिळाल्यानंतरही कोणतीही नोटीस न आल्याने, संस्थेने नियमबाह्य पद्धतीने कॉलेज सुरू ठेवल्याचे सिद्ध होते, असे यादव यांनी नमूद केले.
कॉलेजची इमारत अपूर्ण असणे, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वर्कशॉप यांसारख्या सुविधा उपलब्ध नसणे, तसेच इंजिनिअरिंग कॉलेज गरवारे कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असल्याचे एआयसीटीई आणि तंत्र शिक्षण विभागाला कागदपत्री कळवणे, पण प्रत्यक्षात तेथे काहीही अस्तित्वात नसणे, ही पूर्णपणे अनियमितता आहे. याशिवाय, मुकुंदनगर कोथरूड येथील आयएमसी एमबीए महाविद्यालयात इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग चालवून केवळ नफा कमावण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शासनाची दिशाभूल केली जात आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर डीटीई कार्यालयामार्फत झालेल्या चौकशी समितीतही महाविद्यालयाने गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजेच महाविद्यालयाच्या या अनियमिततेमध्ये दुर्दैवाने तंत्र शिक्षण सहसंचालक दत्तात्रय जाधव यांचाही सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केवळ कॉलेजवरच नाही, तर तंत्र शिक्षण सहसंचालक दत्तात्रय जाधव यांच्यावरही कारवाई करावी, अशी युवासेनेची मागणी आहे. शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून नियमबाह्य पद्धतीने कॉलेज सुरू ठेवणाऱ्या शिक्षण संस्थांना वठणीवर आणणे गरजेचे आहे, असे यादव यांनी म्हटले.
‘एफआरए’ च्या समितीकडून विद्यार्थ्यांची फसवणूक
सर्व पायाभूत सुविधा तपासूनच एफआरए कडून शुल्क निश्चितीसाठी मान्यता दिली जाते. मात्र, मुकुंददास लोहिया कॉलेजकडे कोणत्याही सुविधा अस्तित्वात नसताना या कॉलेजला लाखो रुपये फी निश्चित करण्यास परवानगी दिली. त्यामुळे येथे एफआयए ची समिती सुध्दा या बनवाबनवीमध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे संबंधित समिती सदस्यांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे विनंती आहे असे मत यादव यांनी व्यक्त केले.