राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे, प
.
पवार साहेब खुर्चीवर बसून गप्पा मारत होते; सगळे पॅरामीटर्स एकदम ओके -एकनाथ शिंदे
शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी सविस्तर माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मी रुग्णालयात जाऊन शरद पवार साहेबांची भेट घेतली. सुप्रिया ताई, मातोश्री प्रतिभाताई आणि डॉक्टर तिथे उपस्थित होते. डॉक्टरांशी माझी सविस्तर चर्चा झाली असून पवार साहेबांचे सर्व वैद्यकीय पॅरामीटर्स एकदम ओके आहेत. ते स्वतः खुर्चीवर बसून आमच्याशी बोलत होते. त्यांना उद्यापर्यंत डिस्चार्ज मिळू शकतो, त्यामुळे कार्यकर्त्यांनी किंवा राज्यातील जनतेने काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. या भेटीत आम्ही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. साहेबांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ आहे. ते लवकर बरे होऊन पुन्हा सर्वांना मार्गदर्शन करतील.”
रुग्णालयात असूनही पवारांना दुष्काळाचीच चिंता
दुष्काळी दौऱ्यामुळेच शरद पवारांची प्रकृती बिघडल्याचे सांगत शिंदेंनी त्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले. “शरद पवार साहेब दुष्काळ दौऱ्यावर गेले होते, तिथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना आणि धावपळीमुळे त्यांना फुफ्फुसात संसर्ग (Lung Infection) झाला आणि रुग्णालयात दाखल व्हावे लागले.”
बेडवरूनही शेतकऱ्यांची विचारपूस
“रुग्णालयात उपचार घेत असतानाही त्यांनी मला सातारा जिल्ह्यातील गावांमध्ये आणि महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या भागांत पाणी व दुष्काळाची नेमकी काय परिस्थिती आहे, याची आस्थेने विचारपूस केली आणि यावर लक्ष देण्यास सांगितले. आजारपणातही त्यांना बळीराजाची असलेली तळमळ मोठी आहे.”
ही राजकीय भेट नाही; राजकारणापलीकडची नाती जपली पाहिजेत!
ब्रीच कँडी रुग्णालयातील नेत्यांच्या भेटीगाठींवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना शिंदे यांनी पूर्णविराम दिला. “जेव्हा एखादा अनुभवी आणि देशात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेला ज्येष्ठ नेता आजारी असतो, तेव्हा त्यांची भेट घेण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसतो. राजकारणापलीकडची नाती प्रत्येकाने जपली पाहिजेत. पवार साहेब आणि माझे संबंध राजकारणापुरते मर्यादित नसून कौटुंबिक आहेत.”
मनामध्ये कधीही राजकीय अभिनिवेश ठेवला नाही
“मी मुख्यमंत्री असतानाही राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर साहेब मला फोन करून सांगत होते आणि आम्ही त्याची सोडवणूक करत होतो. आजही ते कधीही प्रश्न असल्यास फोन करतात. त्यांनी किंवा मी कधीही मनात राजकीय अभिनिवेश ठेवला नाही.”
पंतप्रधान मोदींनीही मतभेद बाजूला ठेवून आराम करण्याचा सल्ला दिला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांना केलेल्या फोनवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच राजकीय मतभेद बाजूला ठेवून संकटाच्या काळात सर्वांच्या पाठीशी उभे राहतात, हा त्यांचा मोठेपणा आहे. मोदीजींनीही पवार साहेबांना फोन करून पूर्ण बरे होईपर्यंत विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, कारण महाराष्ट्रासह देशाला त्यांच्या अनुभवाचे मार्गदर्शन नेहमीच आवश्यक असते,” असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
——————————————————————-
हेही वाचा…
ब्रीच कँडीतील ‘ती’ 1 तास चर्चा: मोदींच्या फोनपाठोपाठ पटेल-सुनेत्रा पवारांकडून भेटीगाठी; विलीनीकरणाच्या चर्चांना का आले पुन्हा उधाण? इनसाइड स्टोरी

ज्येष्ठ नेते शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्यांसाठी दाखल असतानाच, रुग्णालयाच्या दालनातून सुरू झालेल्या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यापाठोपाठ आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान शरद पवारांनी पटेल यांना ’11 तारखेनंतर भेटू’ असा दिलेला निरोप आणि दुसरीकडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियांका गांधी व उद्धव ठाकरे यांच्याकडून आलेले फोन, यामुळे या आजारपणाच्या सदिच्छा भेटींमागे ‘दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची’ किंवा नव्या राजकीय समीकरणांची स्क्रिप्ट शिजत आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी