“माझ्या हृदयाला घर मिळाले…” साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा रोमँटिक डान्सचा व्हिडिओ शेअर करताना दिलेले हे कॅप्शन. हसरे चेहरे, प्री-वेडिंग शूटची स्वप्ने आणि एक ‘परफेक्ट कपल’ असल्याचा सार्वजनिक देखावा. पण याच आभासी जगाच्या प
.
पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल याच्या लोहगडावरील कथित हत्याकांडाला (18 जून) एक महिना पूर्ण होत आहे. हे प्रकरण केवळ एक ‘गुन्हा’ नाही, तर आजच्या तरुण पिढीची मानसिकता, ‘सोशल मीडिया’वरील खोटा देखावा, ‘लोग क्या कहेंगे’चा दबाव आणि डिजिटल युगातील तांत्रिक तपासाचे एक ज्वलंत उदाहरण बनले आहे. एका महिन्यानंतर या प्रकरणाने समाजासमोर अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे केले आहेत.
दोन चेहरे: रील लाइफ विरुद्ध रिअल लाइफ
सिया गोयलने सोशल मीडियावर केतनसोबतच्या आनंदी क्षणांचे प्रदर्शन केले होते. मात्र, पोलीस तपासानुसार ती तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत केतनला संपवण्याचा कट रचत होती. सोशल मीडियावरील ‘परफेक्ट लाईफ’ आणि प्रत्यक्षातील ‘गुन्हेगारी मानसिकता’ यातील हा विरोधाभास चक्रावून टाकणारा आहे.
याच प्रकरणावर भाष्य करताना मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे म्हणतात की, “घरच्यांनी सांगितलं म्हणून लग्न केलं, पण मनातून प्रियकराला कधी सोडलंच नाही — इथूनच सगळं चुकत जातं. ‘लग्न झालं तरी माझं प्रेम माझंच’ हा हट्ट इतका आंधळा होतो की जोडीदार माणूस वाटेनासा होतो, फक्त एक ‘अडथळा’ वाटतो. प्रियकराशी मिळून जोडीदाराचा खून रचणं हे प्रेम नाही, तर ही एक मानसिक विकृती आहे ज्याला आपण ‘Obsessive Attachment’ म्हणतो. यात स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याचा जीव घेताना दयामाया उरत नाही. मग खोटी कारणं सांगून समाजाला फसवणं, हे सगळं नियोजनबद्ध असतं. मुळात, जिथे घरात संवाद संपतो आणि हट्ट उरतो, तिथे माणुसकी हरवते आणि गुन्हेगारी जन्म घेते.”
यावर उपाय सुचवताना डॉ. शिसोदे म्हणतात की, “पालकांनी मुलांच्या आवडीनिवडीचा आणि त्यांच्या मनाचा आदर करायला हवा, कारण जबरदस्तीने लादलेलं लग्न कधीच सुखाचं नसतं. तरुणांनीही भावनांच्या आहारी न जाता, नात्यात अडचण असल्यास कायदेशीररीत्या बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारावा; कोणताही प्रश्न ‘खून’ करून सुटत नाही, उलट आयुष्य उद्ध्वस्त होतं.” पुढे त्यांनी जेन-झीच्या मानसिकतेवरही प्रकाश टाकला.

डॉ. शिसोदे पुढे म्हणाले की, “आजच्या तरुण पिढीमध्ये नातेसंबंधांबद्दल एक भावनिक अपरिपक्वता दिसून येते — जेव्हा लग्नानंतर अपेक्षाभंग होतो, तेव्हा ते संवाद, समुपदेशन किंवा कायदेशीर मार्गाऐवजी थेट ‘सुटका’ शोधतात. यामागे ‘Narcissistic Personality’ म्हणजेच स्वतःकेंद्री विचारसरणी असते ‘माझे हित सर्वोच्च’ ही भावना इतक्या टोकाला जाते की दुसऱ्याच्या जीवाचीही किंमत वाटत नाही. जुन्या मित्राचा वापर हा ‘Triangulation’ या मानसशास्त्रीय प्रक्रियेचा भाग असतो. जबाबदारी टाळण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीला साधन बनवले जाते. सोशल मीडियामुळे ‘झटपट सुख’ आणि ‘झटपट बाहेर पडण्याची’ मानसिकता वाढली आहे, त्यात संयम आणि सहनशीलता लोप पावत आहे. कुटुंबातील भावनिक जोड नसणे, बालपणातील ट्रॉमा आणि चुकीच्या मंडळींचा सहवास हे या विकृत निर्णयाचे मूळ कारण ठरतात. थोडक्यात हे गुन्हे नियोजित असतात, क्षणाच्या रागातून नाही; हे एक ‘प्रीमेडिटेटेड मॉरल कोलॅप्स’ आहे जो समाजासाठी अत्यंत गंभीर इशारा आहे.”
याच धर्तीवर गेल्या काही दिवसांत आणखी 2 हत्या झाल्या…
- मे 2025 मध्ये इंदूरच्या सोनम रघुवंशीने लग्नाच्या 9 दिवसांनंतर प्रियकर राज कुशवाहसोबत मिळून पती राजा रघुवंशीची हत्या केली होती. हनिमूनसाठी दोघे मेघालयला फिरायला गेले होते, जिथे राज आणि त्याचे मित्र आधीच उपस्थित होते. सोनम 23 मे रोजी राजाला ट्रेकिंगवर घेऊन गेली. परत येताना राजाची हत्या करवून घेतली.
- फेब्रुवारी 2025 मध्ये मेरठच्या मुस्कान रस्तोगीने बॉयफ्रेंड साहिल शुक्लासोबत मिळून पती सौरभ राजपूतची हत्या केली. मुस्कानने सौरभच्या जेवणात नशेचे औषध मिसळले. तो बेशुद्ध झाल्यावर, तेव्हा साहिलसोबत चाकूने भोसकून हत्या केली. नंतर मृतदेहाचे 3 तुकडे करून निळ्या ड्रममध्ये सिमेंटसोबत भरून टाकले.
‘स्टेटस’चा फार्स: लग्नाला नकार देण्यापेक्षा खून सोपा का वाटला?
पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. मात्र, साखरपुडा झाला असल्याने आणि दोन्ही कुटुंबे प्रतिष्ठित असल्याने, ‘लग्न मोडले तर समाजात बदनामी होईल’ ही भीती तिला होती.
मानसोपचार तज्ज्ञ अलका वाळूजकर यांच्या मते, “काही व्यक्ती वेगवेगळ्या लोकांसमोर वेगवेगळे चेहरे ठेवतात.. बाहेरून प्रेमळ ,सभ्य, विश्वासार्ह दिसणारी व्यक्ती आतून पूर्णपणे वेगळी असू शकते. खुनामध्ये नेहमीच राग नसतो ..कधी आर्थिक लाभ, सामाजिक प्रतिष्ठा, नात्यातील नियंत्रण गमावण्याची भीती किंवा सुडाची भावना कारणीभूत असू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती आकर्षक, शिक्षित किंवा सभ्य वाटते तेव्हा आपण तिच्या इतर गुणांबाबतही सकारात्मक गृहीतके धरतो.. त्यामुळे त्या व्यक्तीतील रेड फ्लॅग दुर्लक्षित होऊ शकतात.”

भारतीय समाजव्यवस्थेत लग्न हा दोन व्यक्तींचा नाही, तर दोन कुटुंबांचा आणि त्यांच्या ‘प्रतिष्ठेचा’ (Status) विषय मानला जातो. एकदा साखरपुडा झाला किंवा सोशल मीडियावर फोटो टाकले की, नाते मोडणे म्हणजे ‘कुटुंबाची नाक कापणे’ असे मानले जाते. या ‘लोग क्या कहेंगे’च्या दबावामुळे अनेक तरुण-तरुणी गुदमरतात. पण प्रतिष्ठेच्या खोट्या ओझ्यापायी थेट एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेण्याइतपत मजल जाणे, हे आपल्या समाजव्यवस्थेचे मोठे अपयश आहे.”

डिजिटल पुराव्यांची ताकद: ‘परफेक्ट मर्डर’चा कट कसा फसला?
सिया आणि चेतनने हा मृत्यू एक ‘अपघात’ वाटावा यासाठी कथितरीत्या परिपूर्ण कट रचला होता. पण डिजिटल पुराव्यांनी त्यांचा भंडाफोड केला.

आजच्या काळात ‘परफेक्ट मर्डर’ अशक्य आहे. तुम्ही फिजिकल पुरावे नष्ट करू शकता, पण डिजिटल फूटप्रिंट्स (उदा. लोकेशन, इंटरनेट सर्च हिस्ट्री, कॉल रेकॉर्ड्स) कधीच पुसता येत नाहीत. या प्रकरणात हेच तांत्रिक पुरावे पोलिसांचा सर्वात मोठा आधार आहेत.”
आरोपींचा बचाव आणि पोलिसांचे प्रत्युत्तर
कोणत्याही गुन्ह्यात दोन्ही बाजू समजून घेणे महत्त्वाचे असते.
- आरोपींची बाजू: चेतन चौधरीने सुरुवातीला “मी घटनास्थळापासून लांब उभा होतो, माझा यात थेट हात नाही” असा बचाव घेण्याचा प्रयत्न केला. तर सियाच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की, हे सर्व पुरावे ‘परिस्थितीजन्य’ आहेत आणि पोलीस कोठडीत दिलेली कबुली पुराव्यांच्या कायद्यानुसार न्यायालयात ग्राह्य धरली जात नाही.
- पोलिसांचे प्रत्युत्तर: पोलिसांच्या दाव्यानुसार, त्यांनी मे महिन्यात लुल्लानगरमध्ये कड्यावरून ढकलण्याची ‘रिहर्सल’ केली होती. तसेच ‘लास्ट सीन टुगेदर’ (शेवटचे एकत्र दिसणे) आणि डिजिटल पुराव्यांची साखळी इतकी भक्कम आहे की आरोपींचा बचाव टिकणे कठीण आहे. (दोन्ही आरोपींनी नुकताच ‘पॉलीग्राफ टेस्ट’ करण्यास न्यायालयात नकार दिला आहे, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे.)

कायदेशीर बाजू: फास्ट ट्रॅक कोर्ट आणि फाशीची शक्यता?
राज्य सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून हा खटला ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ चालवण्याची घोषणा केली असून, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील (SPP) म्हणून नियुक्ती केली आहे. याप्रकरणात आरोपींना शिक्षा होईल का किंवा कोणती शिक्षा होऊ शकते याविषयी आम्ही अॅडव्होकेट महेश भोसले यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
औरंगाबाद खंडपीठातील वकील महेश भोसले म्हणतात की, “यापूर्वीची अशी भरपूर प्रकरणं आहेत की प्रत्यक्ष पुरावा नाही म्हणून आरोपी सुटलेले आहेत. या प्रकरणामध्ये आय विटनेस नाहीये. तसंच काही यातही परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे चालू आहे. आणि परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी पूर्ण करणं म्हणजे गुन्हा घडल्यापासून ते शिक्षेपर्यंत नेण्याची जी साखळी असते ती सिद्ध करणं खूप अवघड असतं. कारण त्यातली एखादी लिंक जरी मिस झाली तर पूर्ण केस संपून जाते. त्याच्यामुळे ही केस आत्ता जरी भावनिकदृष्ट्या खूप वाटत असली तरी भविष्यात चार्जशीटमध्ये काय येतंय आणि ठोस पुरावे या दोघांच्या विरोधात काय आहेत? शिवाय स्वतंत्र साक्षीदार किती आहेत? हेही महत्त्वाचं राहील. कारण आतापर्यंत वक्तव्ये येत आहेत ती मृत्यू झालेल्या मुलाच्या घरच्यांची किंवा मित्रांचे येत आहेत. हे सर्व इंटरेस्टेड विटनेस आहेत. त्यांना वाटतं की माझा मित्र माझा घरचा माणूस मेलाय म्हणून शिक्षा व्हावी. परंतु स्वतंत्र विटनेस ज्यांना ते दोघेही ओळखीचे नाहीयेत असे नाहीत. असं काय समोर येतं आहे जे न्यायाच्या दृष्टीने जास्त महत्त्व असतं या केसमध्ये.”

अॅडव्होकेट महेश भोसले यांनी नूपुर तलवार आणि हेमराज या दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणाचा दाखला देत म्हटले की, त्या प्रकरणातही असंच झालं होतं. तेव्हा वातावरण सगळं भावनिकदृष्ट्या आरोप वगैरे झाले. सीबीआय कोर्टाने दोषी ठरवलं. पण नंतर चार वर्षांनी अलाहाबाद हायकोर्टानं त्यांना मुक्त केलं होतं. त्या प्रकरणामध्ये देखील केवळ परिस्थितीजन्य पुरावे होते. खरं तर त्या प्रकरणात पोलिसांनी बऱ्यापैकी चुका केल्या होत्या. आता या प्रकरणात हा जो मुलगा पडला आहे तो आधी अपघात म्हणून जाहीर झाले आणि त्याच्यानंतर ऐकीव माहितीच्या आधारे संशय घेऊन ही केस सुरु केलेली आहे. त्याच्यामुळे ही सिद्ध होणे ही म्हणजे कन्व्हिक्शनपर्यंत जाण्यासाठी खूप अवघड आहे.
…तर सिया-चेतन हत्येच्या आरोपातून वाचू शकतात का?
अनेकदा परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे खुनाच्या प्रकरणात आरोपी निर्दोष सुटतात. तुम्ही अनेक निकालांमध्ये न्यायालयाची ही टिप्पणी ऐकली असेल- पुराव्यांच्या अभावी आरोप सिद्ध होऊ शकला नाही.
खरं तर, यामागे सर्वोच्च न्यायालयाने बनवलेले नियम आहेत. 1952 मध्ये एका निकालाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयांना सावध केले होते की, कोणत्याही शंकेला पुरावा मानू नये. नंतर 1984 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आणखी एका प्रकरणात 5 सिद्धांत सांगितले…
- प्रत्येक परिस्थिती, म्हणजे हत्येच्या योजनेपासून ते अंमलबजावणीपर्यंत, ज्या काही परिस्थिती सांगितल्या गेल्या, त्या पूर्णपणे सिद्ध झाल्या पाहिजेत.
- प्रत्येक परिस्थिती केवळ गुन्ह्याकडेच निर्देश करणारी असावी, म्हणजे असे नसावे की पोलिसांनी एखादी परिस्थिती सांगावी, पण तिचा गुन्ह्याशी काही संबंध नसावा. उदाहरणार्थ – चेतन केतनच्या हत्येच्या उद्देशानेच किल्ल्यावर गेला होता हे सिद्ध न होणे.
- प्रत्येक परिस्थिती तिच्या स्वरूपात निर्णायक असावी, म्हणजे कोणत्याही दुव्यावरून घटनेबद्दल काहीतरी निष्कर्ष निघत असावा.
- प्रत्येक परिस्थिती योग्य पर्यायी सिद्धांताला नाकारणारी असावी. उदाहरणार्थ, अशी कोणतीही परिस्थिती नसावी, ज्यामुळे केतनच्या मृत्यूमागे दुसरे कोणतेतरी पर्यायी कारण समजू शकेल.
- प्रत्येक परिस्थिती अशी एक साखळी किंवा घटनांची मालिका तयार करावी, ज्यामुळे आरोपींच्या निर्दोष असण्याची कोणतीही शक्यता शिल्लक राहणार नाही.
सियाचे वकील तन्वीर अहमद मीर म्हणतात की, फक्त अनेक गोष्टी संशयास्पद वाटत आहेत हे दाखवून फिर्यादी पक्ष खटला जिंकू शकत नाही. घटनेतील प्रत्येक परिस्थिती स्वतःच सिद्ध झाली पाहिजे आणि ती पुढील कडीशी जोडलेली असावी, तसेच केतनच्या मृत्यूचे दुसरे कोणतेही संभाव्य कारण नाही हे देखील सिद्ध झाले पाहिजे. जर एकही कडी तुटली, तर आरोपींना संशयाचा फायदा मिळेल.
केतनच्या बाबतीत पोलिसांना प्रत्येक दावा पुराव्यात बदलावा लागेल. सिया लग्नामुळे नाखूश होती आणि हेच हत्येचे कारण होते हे सिद्ध करावे लागेल. चेतनसोबतचे तिचे नाते, कॅफेमध्ये दोघांची भेट आणि दोघांच्या योजनेची रंगीत तालीम यातून हे सिद्ध करावे लागेल. फक्त दोघांचे वर्तन संशयास्पद आहे हे सिद्ध करणे पुरेसे नाही, तर फोन, चॅट रेकॉर्ड, CCTV फुटेजमधून ते हत्येचा कट रचत होते हे सिद्ध करावे लागेल.
मीर म्हणतात की, याशिवाय सर्वात महत्त्वाचे हे सिद्ध करावे लागेल की केतन कसा पडला? त्या ठिकाणाची उतार, तो कुठे पडला, केतनचे बूट, पडण्याची दिशा, त्याच्या जखमा, घसरण्याची शक्यता, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतील.
अनेक शक्यता असू शकतात – केतन स्वतः घसरला, किंवा काही वाद झाला, त्यादरम्यान तो पडला, एकाने धक्का दिला, किंवा दोघांनी चिथावले, किंवा हाणामारीत असे घडले. पोलिसांना इतर सर्व शक्यता नाकारून हे सिद्ध करावे लागेल की केतनला धक्का देण्यात आला होता.

सद्य:स्थिती: पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्याची अंतिम तयारी सुरू.
“सून आणायला निघालो होतो, पण…” पीडित कुटुंबाचा संघर्ष
एका महिन्यानंतर केतनच्या घरातील वातावरण अत्यंत सुन्न आणि शोकाकुल आहे. घरातील एकुलता एक तरुण मुलगा, ज्याच्या लग्नाची तयारी घरात सुरू होती, त्याच्या अशा जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी नुकताच कँडल मार्च काढला होता. ते भावुक होत म्हणाले, “माझा 26 वर्षांचा मुलगा विनाकारण मारला गेला. मी घरात सून आणायला निघालो होतो, पण मला माझ्या मुलाचा मृतदेह आणावा लागला. तिला जर माझा मुलगा पसंत नव्हता, तर तिने पहिल्याच दिवशी ‘नाही’ का सांगितले नाही? या गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.”
यापूर्वीची गाजलेली प्रकरणे आणि पॅटर्न
केतन अग्रवाल हत्याकांडाने समाजातील अशाच काही जुन्या घटनांची आठवण करून दिली आहे. खोट्या प्रतिष्ठेपोटी, प्रेमसंबंधांमधील गुंतागुंतीतून किंवा नाते मोडण्याच्या भीतीतून यापूर्वीही देशात साेनम–राजा रघुवंशी प्रकरण, श्रद्धा वालकर प्रकरण किंवा नीरज ग्रोव्हर प्रकरण यांसारख्या घटना घडल्या आहेत. या सर्व घटनांमध्ये एक समान पॅटर्न दिसतो: संवादाचा अभाव, नात्यातील विषारीपणा आणि थंड डोक्याने केलेली गुन्हेगारी. म्हणूनच केतन अग्रवाल खून प्रकरण समाजासाठी एक मोठा धडा आहे, असे म्हणावे लागेल.

एका महिन्यानंतर
पुण्यातील लोहगड येथे झालेल्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणाला एक महिना पूर्ण होत असताना त्याचे वडील विशाल अग्रवाल यांनी शुक्रवार, १७ जुलै रोजी भावनिक पत्रकार परिषद घेत न्यायाची मागणी केली. माझ्या मुलाच्या जाण्याच्या धक्क्याने 17 दिवसांतच माझ्या वडिलांचाही मृत्यू झाला. त्यामुळे मी एकाच वेळी मुलगा आणि वडील दोघांनाही गमावले, अशी वेदना त्यांनी व्यक्त केली.
केतन आणि सियाचे लग्न जुळवणारे नरेंद्र जगन्नाथ मित्तल आणि रेणू मित्तल यांनी आमचा विश्वासघात केला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. “सियाची पार्श्वभूमी त्यांना माहिती होती, तरीही त्यांनी आम्हाला काहीच सांगितले नाही. त्यामुळे तेही या प्रकरणाला तितकेच जबाबदार आहेत,” असे विशाल अग्रवाल म्हणाले.
विशाल अग्रवाल यांनी न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगत, सिया गोयलसह या प्रकरणातील सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. तसेच पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहून केवळ निष्पक्ष आणि जलद न्यायाची मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समाजालाही त्यांनी आवाहन केले. “जर मुलगा किंवा मुलगी पसंत नसेल तर स्पष्ट नकार द्या, पण कोणाच्याही मुलाचा जीव घेण्याइतका टोकाचा मार्ग स्वीकारू नका. दुसरा कोणताही केतन अग्रवाल होऊ नये,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
केतनच्या आईबाबांनी आपल्याला न्याय मिळावा या मागणीसाठी नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. पोलीस आपला तपास करत आहेत, न्यायालयात खटला चालेल आणि न्यायव्यवस्थेनुसार शिक्षाही होईल. पण केतन अग्रवाल परत येणार नाही. खोट्या प्रतिष्ठेच्या आणि दुटप्पीपणाच्या या खेळात समाजाने एक तरुण गमावला आहे. हा मृत्यू समाजाला विचार करायला लावणारा आहे की, आपण नक्की कोणत्या दिशेने चाललो आहोत?
(टीप: या प्रकरणातील आरोपींवर अद्याप न्यायालयात दोषारोप सिद्ध झालेले नाहीत. हा लेख पोलीस तपास, तज्ज्ञांची मते आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे.)