मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका कायम ठेवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीनंतर आता ते सातारा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. आज मायणी, मसूर आणि पाचवड ये
.
मायणीपासून सातारा दौऱ्याला सुरुवात
मनोज जरांगे पाटील आज सकाळी 11 वाजता मायणी येथे मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता कराड तालुक्यातील मसूर येथे मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि नागरिकांशी चर्चा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ते पाचवड येथे दाखल होतील. आजचा त्यांचा मुक्काम कराड येथे असणार आहे.
उद्या सकाळी जरांगे पाटील पाटण येथे जाणार असून, तेथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, या मागणीसाठी जरांगे पाटील राज्यभर दौरा करत आहेत. 7 ऑगस्टपासून त्यांनी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असून, सांगलीनंतर आता सातारा जिल्ह्यात त्यांच्या बैठका आणि सभा होत आहेत.
29 ऑगस्टच्या उपोषणासाठी राज्यभर दौरा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील नागरिक आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी ते राज्यभर दौरा करत आहेत.
सातारा हा मराठा समाजासाठी महत्त्वाचा जिल्हा मानला जात असल्याने जरांगे पाटील यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे. त्यांच्या बैठका आणि सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
साताऱ्यात सापडल्या सुमारे 14 हजार कुणबी नोंदी
सातारा जिल्ह्यात कुणबी-मराठा नोंदींचाही मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 14 हजार कुणबी-मराठा नोंदी सापडल्याची माहिती समोर आली आहे. या नोंदींच्या आधारे प्रशासनाकडून संबंधितांना कुणबी प्रमाणपत्रेही देण्यात आली आहेत.
मात्र, सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिकेत कायम आहेत. 29 ऑगस्टच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा दौऱ्यात या मुद्द्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
जरांगेंच्या उपोषणाआधी सरकारची महत्त्वाची बैठक
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारच्या पातळीवरही हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षण उपसमितीची आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीचे नेतृत्व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील करणार आहेत.
या बैठकीत मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. विशेषतः मराठा-कुणबी नोंदी, कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया आणि या प्रक्रियेत शासनाच्या पातळीवर येणाऱ्या अडचणी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचा आढावा
मराठा समाजातील नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेत आतापर्यंत झालेली कार्यवाही, प्रलंबित प्रकरणे आणि प्रशासनासमोरील अडचणी याचा आढावा उपसमितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे.
याशिवाय मराठा समाजासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि सुविधांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला जाणार आहे. मात्र, आजच्या बैठकीत मराठा-कुणबी नोंदींचा प्रश्न आणि मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आक्रमक भूमिका हा प्रमुख चर्चेचा विषय राहण्याची शक्यता आहे.
सरकार शिष्टमंडळ पुन्हा जरांगेंच्या भेटीला जाणार?
यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारकडून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा सरकारकडून शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी जाणार का, याकडेही लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षण उपसमितीच्या आजच्या बैठकीनंतर सरकारची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा आणि दुसरीकडे सरकारची उपसमितीची बैठक, यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सातारा दौऱ्यातील सभा आणि बैठकींमध्ये ते मराठा आरक्षण, कुणबी नोंदी, कुणबी प्रमाणपत्रे आणि 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत काय भूमिका मांडतात, याकडे मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
सरकार मनोज जरांगेंना का घाबरतेय?:एक दिवस उपोषणाला बसले की मंत्री धावतात; म्हणूनच हिंमत वाढली, ओबीसी नेत्यांना टार्गेट करू नका- विजय वडेट्टीवार

“मनोज जरांगे यांना राज्य सरकार नक्की का घाबरत आहे? ते उपोषणाला बसले की सरकारचे मंत्री त्यांच्यापुढे पायघड्या घालतात, त्यामुळेच त्यांची हिंमत वाढली आहे, असे म्हणत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी