मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका करत 29 ऑगस्टपासून होणाऱ्या आंदोलनापूर्वी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सरकारने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नसल्याचा आरोप करत,
.
मराठ्यांनी विश्वास ठेवला, पण सरकारने निराश केले
माध्यमांशी बोलताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने सरकारवर विश्वास ठेवून सत्ता दिली. मात्र त्यानंतर समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आरक्षण, नोकऱ्या, विद्यार्थ्यांचे प्रवेश, विविध योजनांची अंमलबजावणी आणि एबीसी/एसबीसी प्रवर्गातील भरती यांसारखे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यांनी दावा केला की, 2014 पासून आजपर्यंत अनेक मराठा तरुणांची पीएसआय, डीवायएसपी, महावितरणसह विविध विभागांतील निवड प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी पक्षापेक्षा समाजाला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वतंत्र मराठा मंत्रालयाची गरज
जरांगे यांनी मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी पुन्हा एकदा केली. त्यांच्या मते, सारथीसह विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा, फी परतावा आणि इतर लाभ मिळत नाहीत. स्वतंत्र मंत्रालय झाल्यास मराठा समाजाच्या सर्व योजना आणि प्रश्न एकाच ठिकाणी मार्गी लागू शकतील, असे त्यांनी सांगितले.
58 लाख नोंदींबाबत सरकारला इशारा
मराठा-कुणबी नोंदींच्या मुद्द्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख नोंदींमध्ये कोणतीही कपात होऊ नये. या नोंदी कमी करण्याचा प्रयत्न झाल्यास समाजात मोठा संताप निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
“58 लाख नोंदी शोधल्या आहेत, त्या कमी करण्याचा प्रयत्न करू नका. जर नोंदी कमी झाल्या तर त्याचे गंभीर परिणाम होतील,” असे ते म्हणाले.
28 ऑगस्टला पुराव्यांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
ज्या मराठा नागरिकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत, ज्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत किंवा ज्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाही, त्यांनी 28 ऑगस्ट रोजी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. सरकार प्रलंबित अर्ज नसल्याचा दावा करत असेल तर समाजाने प्रत्यक्ष पुरावे दाखवावेत, असेही त्यांनी म्हटले.
अभिजीत दीपकेंना धमक्या? आम्ही घाबरत नाही
अभिजीत दीपके यांना कथित धमक्या मिळत असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. “धमक्यांना काय घाबरायचं? आम्ही धमक्यांना भीक घालत नाही. गरीब मराठा समाजाच्या हितासाठी लढत आहोत. कोणी धमक्या दिल्या तर त्यालाही उत्तर देण्याची ताकद आमच्यात आहे,” असे ते म्हणाले.
29 ऑगस्टच्या आंदोलनावर सर्वांचे लक्ष
मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रे, भरती प्रक्रिया, शैक्षणिक सवलती आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या मागण्यांसाठी 29 ऑगस्टपासून आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सरकारने त्यापूर्वी ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी पुन्हा दिला.
हेही वाचा…
पुण्यात केवळ काँग्रेसचे नाही तर हे तमाम पुणेकरांचे आंदोलन:नीट पेपरफुटी, अमित शहांच्या दौऱ्यावरून सुप्रिया सुळेंचा घणाघात

नीट पेपरफुटी प्रकरण आणि न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार पक्ष) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज देशातील नवीन पिढी अस्वस्थ असून ही अत्यंत काळजीची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाची आणि लाठीचार्जची पारदर्शकपणे ‘एसआयटी’ मार्फत चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी