Headlines

MPSC Nipun Setu Launched | Inspired by UPSC Pratibha Setu



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) प्रतिभा सेतूच्या धर्तीवर निपूण सेतू उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे अंतिम निवड यादीत शिफारस न झालेल्या उमेदवारांना सेवेची संधी मिळणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय आज जारी

.

शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी विविध स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. सदर परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने उमेदवार पात्र ठरत असले तरी उपलब्ध पदसंख्या मर्यादित असल्यामुळे अंतिम निवडीसाठी केवळ काही उमेदवारांचीच शिफारस केली जाते. परिणामी, अनेक गुणवंत व सक्षम उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता, स्पर्धात्मक परीक्षांमधून विकसित झालेली विश्लेषणक्षमता, नेतृत्वगुण तसेच सार्वजनिक सेवा करण्याची मानसिकता असूनदेखील त्यांना अपेक्षित रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) मुलाखत फेरीपर्यंत पात्र ठरलेल्या परंतु अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांसाठी “प्रतिभा सेतू” पोर्टल विकसित केले आहे.

याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत (मुलाखत / कौशल्य चाचणी) पोहोचूनही अंतिम निवड यादीत स्थान मिळवू न शकलेल्या राज्यातील गुणवंत उमेदवारांच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा लाभ राज्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासासाठी करून घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने उमेदवारांचे तपशील सार्वजनिक तसेच विशेषतः महाराष्ट्रातील खाजगी क्षेत्रातील संभाव्य नियोक्त्यांना आणि उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी, उद्योग विभागामार्फत विकसित केलेल्या एक खिडकी ‘मैत्री २.०’ (MAITRI २.०) पोर्टल अंतर्गत “निपुण सेतू” हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. या अनुषंगाने मंत्रिमंडळाने १३ एप्रिल २०२६ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार शासनाने ‘निपूण सेतू’ हा उपक्रम सुरू केला आहे, असे आज जारी झालेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

अ) उपक्रमाची व्याप्ती व उमेदवारांची पात्रता निकष: १. पात्रता: हा उपक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत (मुलाखत फेरी / कौशल्य चाचणी / शारीरिक चाचणी, जी लागू असेल ती) पोहोचलेल्या, परंतु अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या सर्व उमेदवारांसाठी लागू राहील.

२. कालावधी व अंमलबजावणी: हा उपक्रम सदर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे पुढे आयोजित होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अनिवार्यपणे लागू राहील. ३. भूतलक्षी तरतूद (Retrospective Provision): मागील एका वर्षात झालेल्या परीक्षांच्या अंतिम टप्प्यातील उमेदवारांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संमती पत्र प्राप्त झाल्यास आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्यास, अशा उमेदवारांची माहिती देखील या पोर्टलवर समाविष्ट करण्यात येईल.

ब) पोर्टलवर उपलब्ध करावयाची उमेदवारांची माहिती (Data Fields):

महाराष्ट्रातील खाजगी उद्योजक, कॉर्पोरेट्स आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना योग्य मनुष्यबळ निवडता यावे यासाठी उमेदवारांचे खालील तपशील पोर्टलवर उपलब्ध राहतील. १. उमेदवाराचे पूर्ण नाव आणि जन्मवर्ष. २. शैक्षणिक पात्रता (पदवी, पदव्युत्तर पदवी, विशेष प्राविण्य). ३. पूर्व कामाचा अनुभव (असल्यास) ४. संबंधित परीक्षेचे नाव आणि अंतिम टप्यात (मुलाखत / कौशल्य चाचणी) मिळालेले गुण. ५. उमेदवाराचा संपर्क तपशील (ईमेल आणि मोबाईल क्रमांक – केवळ अधिकृत नियोक्त्यांनाच दृश्यमान).

(क) डेटा गोळा करण्याची व प्रदर्शित करण्याची कार्यपद्धती: १. स्वयंचलित डेटा स्थलांतर (API Integration): महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) प्रत्येक परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर, अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या, तथापि अंतिम निवडयादीत समाविष्ट न झालेल्या उमेदवारांचा वरील डेटा निपुण’ पोर्टलवर दरवर्षी आपोआप API (Application Programming Interface) द्वारे सुरक्षितपणे स्थलांतरित करेल.

२. डेटा दृश्यमानतेचा कालावधी (Data Visibility): उमेदवाराचा डेटा आयोगाच्या अन्य परिक्षेत त्याची निवड होईपर्यंत निपुण पोर्टलवर संभाव्य नियोक्त्यांसाठी दृश्यमान राहील. त्यानंतर हा डेटा निपुण पोर्टलद्वारे आपोआप वगळला जाईल.

ड) उमेदवारांची संमती आणि माहितीची गोपनीयता (Data Privacy & Consent): १. अनिवार्य संमती (Consent):

अ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या परिक्षेचे फॉर्म भरताना त्यांचा डेटा परिक्षा अंतिम निकालानंतर निपुण सेतु पोर्टलवर प्रकटन करण्याबाबत संमती (Digital Opt-in Consent) घेण्यात येईल.

आ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राप्त झालेले उमेदवारांचे तपशील नियोक्त्यांना त्यांनी दर्शविलेल्या आवश्यक अर्हतेनुसार निपुण सेतु मार्फत उपलब्ध करुन देण्यात येतील.

इ) नियोक्त्याकडून उमेदवारांना नियुक्ती देताना उमेदवारांकडून नियुक्ती स्वीकृतीबाबतचे डिजिटल संमती पत्र (Digital Consent) घेण्यात येईल.

२. गोपनीयता सुरक्षा: उमेदवारांच्या माहितीची गोपनीयता (Privacy) पूर्णपणे सुरक्षित राहील याची दक्षता ‘मैत्री’ पोर्टलच्या आयटी विंगकडून घेतली जाईल. हा डेटा केवळ ‘मैत्री’ पोर्टलवर नोंदणीकृत आणि पडताळणी झालेल्या (Verified) अधिकृत खाजगी उद्योजकांना आणि संस्थांनाच तसेच शासकीय/निमशासकीय संस्था/मंडळे / महामंडळे यांना रोजगाराच्या हेतूसाठी पाहता येईल. डेटाची कोणत्याही प्रकारची गळती किंवा व्यावसायिक गैरवापर होणार नाही याची तांत्रिक खबरदारी (Encryption & Access Control) मैत्री पोर्टलद्वारे घेतली जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *