Headlines

शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार बिनविरोध:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- ही पुढील विजयाची नांदी; मविआवर जोरदार टोलेबाजी




महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या दिवशी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद तसेच बंडखोरी देखील पाहायला मिळाली. मात्र, अर्ज माघारीच्या वेळेस अनेकांनी अर्ज मागे घेतले आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील अंतर्गत वाद छत्रपती संभाजीनगर येथे पाहायला मिळाला. मात्र ती जागा भाजपला सोडण्यात आली. त्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचा उमेदवार बिनविरोध झाला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, सर्व मतदारांना मी धन्यवाद देतो. ठाणे पालघर विधान परिषदेतल्या मतदारांनी ही निवडणूक बिनविरोध केली. उमेदवारांनाही धन्यवाद देतो. ठाण्यात निवडणूक बिनविरोध झाली आणि ठाण्यात विजयाचे फाटक बिनविरोध उघडले. निवडणूक झाली असती तरी बहुमत आमचेच होते. ठाणे पालघर विधान परिषद आणि यवतमाळ विधान परिषद दुष्यंत चतुर्वेदी हे देखील निवडून आले आहेत. शिवसेनेचे 2 बिनविरोध आहे, भाजपचे 2 आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाचे 2 बिनविरोध आले. म्हणजे 6 बिनविरोध आले. ही पुढील विजयाची नांदी आहे. जळगाव आणि नाशिक चर्चेअंती तिथे देखील बिनविरोध होऊ शकतात. महाविकास आघाडीची बिघाडी पाहायला मिळाली पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व 17 जागा महायुती जिंकेल असे मी यापूर्वी देखील सांगितले होते. महाविकास आघाडीमध्ये जी काही बिघाडी पाहिली आपण, म्हणजे त्यांचे कोणाचे कोणात पायपुस नाही. या निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणात गटबाजी, मतभेद समोर आले आणि उमेदवारांनी देखील अनेक ठिकाणी माघार घेतली. यावरून महाविकास आघाडीची काय परिस्थिती झाली आहे, हे आपण यापूर्वी देखील पाहिले आहे. महायुतीची यशस्वी वाटचाल सुरू महाराष्ट्रात महायुती मजबुतीने यशस्वी वाटचाल करत आहे. कारण महायुती जेव्हा 2022 ला महायुतीचे सरकार आले, तेव्हापासून या राज्यात विकासाची पायाभरणी, विकासाची घोडदौड, केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सातत्याने महाराष्ट्राला पाठबळ देण्याचे काम करतात. मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात जे काही काम केले, विकास प्रकल्प केले, अनेक योजना केल्या त्याचे फळ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मिळाले. आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुढील वाटचाल करत आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते स्थगिती सरकार होते, आमचे प्रगती सरकार पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना विकासाला ब्रेक लावण्याचे काम केले, स्थगिती करण्याचे काम केले. ते एक प्रकारचे स्थगिती सरकार होते, आमचे प्रगती सरकार आहे. त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय अॅक्सलरेटरवर आहे. त्यामुळे आमची विकासाची गाडी मोठ्या वेगाने पुढे जात आहे. त्यामुळेच लोक विश्वास दाखवत आहेत, की महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर त्या त्या मतदारसंघात विकासकामे होतील. महायुती सगळ्या जागा जिंकणार एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती मजबुतीने पुढे जात आहे. महायुतीचे 17 पैकी 17 उमेदवार निवडून आणायचे काम आम्ही करणार आहोत. रायगडला देखील महेंद्र दळवी, थोरवे, भरत गोगावले यांनी पाठिंबा दिला. पुण्यात देखील आपला उमेदवार होता. तिथे सुनेत्रा ताईंनी फोन केला आणि आपण तिथे माघार घेतली. संभाजीनगरमध्ये तसेच इतरही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे होते, त्यांना माघार घ्यायला लावली. पैसे वाटले म्हणता, तुम्ही होतात का मोजायला? महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाले, त्यांची आघाडी जी आहे, त्यात अशा प्रकारे जे आपण पाहिले की कोणी कुठे उमेदवारी भरली, कोणी कुठे माघार घेतली, याचाही कोणाला पत्ता नाही. हे आपण बघितले आहे. बिनविरोध होण्यासाठी पैसे वाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला, त्यावर शिंदे म्हणाले, पैसे मोजायला ते होते का तिकडे? मी एवढेच सांगतो, ज्या उमेदवारांनी माघार घेतली, त्यांनी पाहिले आपल्याकडे मते किती आहेत आणि महायुतीमध्ये किती आहेत. ते उमेदवार समजदार आहेत. उलट जर निवडून येणाऱ्या उमेदवाराला मदत केली तर आमच्या विभागात कामे होतील. मुंबईतील मान्सूनसाठी प्रशासन सज्ज मुंबईतील मान्सूनच्या तयारीबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, प्रशासन पूर्णपणे अलर्ट आहे. दरवर्षीप्रमाणे त्यांचे नियोजन चोख ठेवले आहे. कुठलेही संकट आले तर प्रशासन यंत्रणा तयार आहे. कुठेही जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. क्लस्टरबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, क्लस्टरच्या बाबतीत आज बैठक झाली. ही योजना देशातील पहिली योजना आहे. लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी हा प्रकल्प आणला आहे. ठाणे महापालिका आणि सिडको मिळून हा प्रकल्प राबावत आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *