Headlines

Russia’s Arctic oil project begins; 30 million tons of annual supply could be an alternative to the Gulf


  • Marathi News
  • National
  • Russia’s Arctic Oil Project Begins; 30 Million Tons Of Annual Supply Could Be An Alternative To The Gulf

मॉस्को/नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमेरिका आणि युरोपीय देशांच्या निर्बंधांनंतरही रशियाने आर्क्टिक क्षेत्रात आपला महाकाय ‘व्होस्तोक ऑइल’ प्रकल्प सुरू केला आहे. २०२७ च्या दुसऱ्या सहामाहीपर्यंत वर्षाला ३ कोटी टन कच्च्या तेलाचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे भारतासह आशियाई देशांना आखाती देशांशिवाय तेल खरेदीचा एक मोठा सक्षम पर्याय मिळू शकतो. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आर्क्टिक टँकर ‘व्हॅलेंटिन पिकुल’मध्ये कच्च्या तेलाची पहिली खेप भरण्याच्या कामाचा शुभारंभ केला. रशियन कंपनी रोसनेफ्टचा हा प्रकल्प उत्तर सायबेरियातील तैमिर भागात आहे. यामध्ये वानकोर आणि पायाखासह अनेक तेल क्षेत्रांचा समावेश आहे.

या प्रकल्पातून जमिनीतून काढलेले तेल ७९० किमी लांबीच्या पाइपलाइनद्वारे कारा समुद्रातील बुख्ता सेव्हेर टर्मिनलपर्यंत पोहोचेल. तिथून टँकरमध्ये भरून ते परदेशात पाठवले जाईल. कंपनीच्या माहितीनुसार, या प्रकल्पात ७०० कोटी टन तेलाचे साठे आहेत. २०३० पर्यंत हा वार्षिक पुरवठा ५ कोटी टनांवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. भारतासाठीही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.

प्रकल्प: १६,२८० यंत्रे व ५० हजार कर्मचारी

व्होस्तोक प्रकल्पात ५० हजारांहून अधिक कर्मचारी काम करत असून ही संख्या वाढवण्याची योजना आहे. प्रकल्पाच्या कामासाठी १६,२८० यंत्रे व उपकरणे तैनात आहेत. प्रकल्पाशी संबंधित हवाई वाहतुकीसाठी ‘सेव्हेरनी विमानतळ’ उभारले जात आहे.आतापर्यंत या प्रकल्पात ४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.

तेलात सल्फर खूप कमी, रिफायनरीजला फायदेशीर

व्होस्तोक प्रकल्पातील कच्च्या तेलात सल्फरचे प्रमाण केवळ ०.०१ टक्के ते ०.१ टक्के एवढे अल्प आहे. कच्च्या तेलाचा दर्जा ठरवण्यात सल्फरची पातळी निर्णायक ठरते. पेट्रोल आणि डिझेल तयार करताना हे सल्फर वेगळे करावे लागते. सल्फरचे प्रमाण कमी असलेले तेल खर्च मोठ्या प्रमाणावर कमी करते.

निनाद शेठ, आंतरराष्ट्रीय विषयाचे तज्ज्ञ

भारतासाठी संकटकाळात जीवनवाहिनी ठरणार हा प्रकल्प

भारताला काय फायदा होणार? व्होस्तोक प्रकल्प भारताच्या ऊर्जा सुरक्षेचा एक मोठा आधार बनेल. हा तेल पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनीतून न होता इतर सागरी मार्गाने होणार असल्याने, भारताकडे पुरवठ्याचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध असेल.

प्रकल्प किती मोठा, याचा परिणाम? व्होस्तोक प्रकल्पाचे सुरुवातीचे वार्षिक उद्दिष्ट ३ कोटी टन आहे. हे प्रमाण भारताच्या २०२४-२५ या वर्षातील देशांतर्गत कच्च्या तेलाच्या उत्पादनापेक्षाही अधिक आहे. त्या वर्षात भारताने २.८७ कोटी टन तेल उत्पादन केले.

अमेरिकेच्या निर्बंधांचा किती परिणाम? भारत आणि रशिया यांच्यातील बहुतांश व्यापार हा स्थानिक चलनांमध्ये होत आहे. त्यामुळे अशा निर्बंधांचा परिणाम नाही.

रशियाकडून तेल किती स्वस्त मिळते? भारत गरजेचा मोठा हिस्सा रशियाकडून खरेदी करत आहे. भारताला ३०% बचत मिळत आहे.

मलक्का सामुद्रधुनीच्या मार्गाने भारतात तेल

आर्क्टिक ऑइल पाइपलाइनद्वारे बुख्ता सेव्हेर टर्मिनलपर्यंत पोहोचेल. तिथून पूर्व आर्क्टिक, बेरिंग मार्ग आणि मलक्का सामुद्रधुनीमार्गे ते भारतात येईल. प्रत्यक्ष मार्ग कोणता असावा, हे जहाज, खरेदीदार आणि वाहतूक खर्चावर निश्चित केले जाईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *