राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची कर्जवसुलीसाठी होणारी पिळवणूक, रखडलेले प्रकल्प आणि शहरी भागातील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी (20 नोव्हेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परि
.
पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये 450 ते 500 कोटींचा एसआरए-टीडीआर घोटाळा
मुंबई आणि ठाण्यानंतर आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा (एसआरए) मोठा घोटाळा उघडकीस आल्याचे शिंदे यांनी सांगितले. बीएसयूपी (BSUP) योजनेंतर्गत ज्यांचे यापूर्वीच पुनर्वसन झाले आहे, तिथे नवीन अतिरिक्त आणि बोगस झोपडीधारक दाखवून टीडीआर लाटण्याचा प्रयत्न झाला आहे. झोपड्यांची प्रत्यक्ष संख्या आणि मंजूर प्रकल्पातील संख्या यात मोठी तफावत असून झोपड्यांचे मूळ क्षेत्रफळ अचानक तिपटीने कसे वाढले? तसेच 70 टक्के संमती नेमकी कोणाकडून गोळा केली गेली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वसुली न केल्यास तीव्र आंदोलन
या 450 ते 500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व शासनाचा बुडालेला महसूल 100 टक्के वसूल करावा; अन्यथा आगामी काळात याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही फायनान्स कंपन्यांच्या जप्तीच्या नोटिसा सुरूच
राज्यातील दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका शशिकांत शिंदे यांनी केली. दीपावलीपूर्वी जाहीर केलेली 5000 रुपयांची अग्रीम मदत अद्याप बीड जिल्ह्यासह राज्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. केंद्र सरकारकडूनही महाराष्ट्राला कोणतीही मदत मिळवण्यात राज्य सरकार कमी पडले आहे.
फायनान्स कंपन्यांवर पोलीस कारवाई का नाही?
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आदेश देऊनही बँका व मायक्रो फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांना हप्त्यांसाठी तगादा लावून जप्तीच्या नोटिसा पाठवत आहेत. यामुळे मराठवाडा व विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढत असूनही कंपन्यांवर पोलीस कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी केला.
धान उत्पादक आणि वन्यप्राणी नुकसान भरपाई
कोकण आणि विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप बोनस मिळालेला नाही. अतिवृष्टी आणि करपा रोगामुळे भातशेती उद्ध्वस्त झाल्याने संपूर्ण रायगड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. तसेच, छत्रपती संभाजीनगरसह ग्रामीण भागात रोही आणि नीलगायींमुळे पिकांचे 2 रुपयांचे नुकसान झाले तर 25 पैसे इतकी तुटपुंजी भरपाई मिळते; वनमंत्री गणेश नाईक यांनी जाळ्या लावण्यास सकारात्मकता दाखवली असली तरी वन विभागाकडे निधीच नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तिजोरीत पैसे नसल्याने इंदू मिल स्मारकाचा खर्च 350 कोटींनी वाढला
दादर येथील इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम निधीअभावी गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्याचा आरोप शिंदे यांनी केला. या विलंबाने आणि जागतिक परिस्थितीमुळे प्रकल्पाचा खर्च 350 कोटी रुपयांनी वाढला असून, त्याचा प्रस्ताव गेल्या 6 महिन्यांपासून शासनाकडे धूळखात पडून आहे.
तसेच, पुण्यात 20 टक्के पाणीकपात लागू झाली असून मोरबे धरणाच्या पाण्यावरून ठाणे आणि नवी मुंबईतील सत्ताधाऱ्यांत वाद सुरू आहे. राज्य मंत्र्यांनी जिल्हास्तरीय पाणी वाटप समित्यांचे अधिकार काढून घेतल्याने नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे उद्योगांचे पाणी तात्काळ कपात करून पिण्याच्या पाण्याला आणि शेतीला प्राधान्य द्यावे व जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार परत द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना छत्रपती संभाजीनगरच्या नगरसेविकांचा 35 लाख रुपये खर्चून केरळ अभ्यास दौरा काढणे अयोग्य असून, त्याऐवजी दुष्काळाचा अभ्यास करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
विलीनीकरणाचा विषय सुप्रिया सुळेंनी संपवला
राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींवरही शशिकांत शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानंतर सुरू झालेल्या चर्चांना पूर्णविराम देताना शिंदे म्हणाले की, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी जाहीरपणे सांगितले आहे की विलीनीकरणाचा मुद्दा संपलेला आहे, हाच पक्षाचा अंतिम निर्णय आहे. तसेच, बारामतीत शिंदे गटाने कार्यालय उघडले असले तरी बारामतीकरांचे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरील प्रेम अढळ आहे.
रोहित पवारांच्या विधानांवर स्पष्टीकरण
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदांतील विधाने ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे सुप्रिया सुळे यांनीही स्पष्ट केले आहे आणि या नव्या घडामोडींबाबत प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याशी चर्चा झालेली नाही. मात्र, या प्रकरणाची सीआयडी (CID) आणि सीबीआयमार्फत (CBI) तात्काळ चौकशी होऊन अपघात की घातपात हे सत्य बाहेर यावे, हीच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि संपूर्ण पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
हिवाळी अधिवेशन आणि महायुतीतील धुसफूस
पुढील महिन्यात नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेतेपदाची निवड न करणे ही लोकशाहीची पायमल्ली आहे. सातारा जिल्हा बँक आणि सांगलीत गोपीचंद पडळकर यांना शह देण्यासाठी शिंदे गट व राष्ट्रवादीने भाजपला बाजूला सारले, यातून महायुतीतील अंतर्गत विसंवाद उघड झाला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या 2 ते 3 वर्षे आधी बोलावलेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीतून सर्व समाजांना समान न्याय मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
———————————————————————–
हेही वाचा…
मेरिटवर शिवसेना कालही उद्धवजींचीच होती आणि उद्याही राहील: बारामती विमानतळाचानिधी आधीच मिळाला असता तर कदाचित दादांचा अपघात टळला असता –सुप्रिया सुळे

सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे. “मी कोणतीही भविष्यवाणी करत नाही; मात्र गुणवत्तेच्या (मेरिट) आधारावर शिवसेना हा पक्ष कालही उद्धव ठाकरे यांचाच होता, आजही आहे आणि उद्याही त्यांचाच राहील,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. शुक्रवारी (20 नोव्हेंबर 2026) बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बारामती विमानतळाच्या विकासासाठी मंजूर झालेला 64 कोटी रुपयांचा निधी, इंदापूरमधील मतदार यादीतून नावे वगळल्याची कथित ऑडिओ-व्हिडिओ क्लिप, दुष्काळी परिस्थिती आणि शरद पवार यांच्या बारामती दौऱ्याबाबत सविस्तर माहिती दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी