![]()
दीपावलीचा आनंद प्रत्येकाच्या आयुष्यात प्रकाश, उत्साह आणि समाधान घेऊन यावा या उदात्त हेतूने एक हात आपुलकीचा… आनंदी दीपावली २०२६ या विशेष उपक्रमांतर्गत अंध बांधवांसाठी शिधावाटप व सेवाव्रत पुरस्कार वितरण सोहळा गुरूवारी आदर्श पब्लिक स्कूल, कुर्डूवाडी येथे उत्साहात पार पडला. सक्षम प्रतिष्ठान आकुलगाव, आदिशक्ती शिक्षण संस्था वेताळवाडी, आदर्श पब्लिक स्कूल कुर्डुवाडी आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणे यांच्या विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. हेलन केलर आणि लुई ब्रेल यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित अंध बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दीपावलीनिमित्त सुमारे दीडशेहून अधिक अंध बांधवांना फराळाचा शिधा भेट देण्यात आला तसेच स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आदिशक्ती शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे होते. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे, डॉ. चंदन राठोड, शिक्षक आघाडी भाजप अध्यक्ष प्रशम कोल्हे, सारिका कापरे, शिल्पा चिंचवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सक्षम प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संजय रामदास बैरागी यांनी केले. सूत्रसंचालन गणेश ठवरे यांनी केले. आभार राष्ट्रीय दृष्टिहीन संघ जिल्हा शाखा सोलापूरचे अध्यक्ष कबीर माने यांनी मानले. ऑडिओ बुक्स बनवल्याबद्दल प्राची गुर्जर यांचा गौरव या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे अंध क्षेत्रातील ज्येष्ठ समाजसेविका प्राची अनिल गुर्जर यांना कै. सखूबाई रामदास बैरागी स्मृती सेवाव्रत पुरस्काराचा प्रथम मानकरी म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांचा विशेष सत्कारमूर्ती म्हणून गौरव करण्यात आला. अंध व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांना स्वावलंबी बनवणे, ऑडिओ बुक्स व अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणे अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Source link
अंध बांधवांची प्रकाशमान दिवाळी:कुर्डुवाडीमध्ये प्राची गुर्जर यांना सखूबाई बैरागी स्मृती पुरस्कार प्रदान