![]()
प्रतिनिधी | कोपरगाव २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या हितासाठी माघार घेणारे भाजपचे तरुण नेतृत्व विवेक कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोल्हे यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवड समितीने विधान परिषदेसाठी ५ जणांना उमेदवारी जाहीर केली. यात कोपरगाव येथीलविवेक कोल्हे यांचे नाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा दिलेला शब्द पाळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. २०२४ च्या निवडणुकीत कोपरगाव मतदारसंघातून विवेक कोल्हे इच्छुक होते. मात्र, जागावाटपात हा मतदारसंघ महायुतीमधील राष्ट्रवादीच्या आशुतोष काळे यांच्याकडे गेला. पक्षादेश मानून कोल्हे यांनी त्यावेळी माघार घेतली, ज्यामुळे काळे यांचा विजय सुकर झाला. त्यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कोल्हे यांना “वाऱ्यावर सोडले जाणार नाही, त्यांचे योग्य पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदींनी दिले होते. काही काळापूर्वी सहकारी साखर कारखान्याच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कोल्हे यांच्या कार्याचे कौतुक केले होते. त्यांच्या नेतृत्वाची दखल घेत त्यांना मोठी जबाबदारी देण्याचे संकेत तेव्हाच मिळाले होते. या निर्णयामुळे कोपरगावतील त्यांच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे.
Source link
अखेर विवेक कोल्हेंना विधान परिषदेची उमेदवारी:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय पुनर्वसनाचा दिलेला शब्द पाळल्याची चर्चा