![]()
काळ्या पैसे व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, या प्रकरणात पोलिसांकडून अटक करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांनी दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) अधिकारी असल्याची बतावणी केली. बँक खात्याचा वापर काळ्या पैसे व्यवहारात करण्यात आला असून, बँक खात्यातून २२ कोटी रुपयांची रक्कम अन्य खात्यात पाठविण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात येणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील अशी धमकी चोरट्यांनी त्यांना दिली. त्यानंतर घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या खात्यात पंधरा ते वीस दिवसांत चोरट्यांच्या खात्यात आठ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस निरीक्षक एन गायकवाड तपास करत आहेत. पीएमपी प्रवासी ज्येष्ठाकडील दोन लाखांची सोनसाखळी लंपास पीएमपी प्रवासी ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील दोन लाख रुपयांची सोनसाखळी चोरट्याने लांबविल्याची घटना विमाननगर भागात घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे वाघोलीतील उबाळेनगर भागात राहायला आहेत. मंगळवारी (६ ऑक्टोबर) सायंकाळी पाचच्या सुमारास ते विमाननगर ते वाघोली या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होते. बसमध्ये गर्दी होती. गर्दीत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दोन लाख रुपयांची सोनसाखळी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक एस गुंड तपास करत आहेत.
Source link
अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची 8 लाखांची फसवणूक:काळ्या पैशांच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर केल्याचे सांगून सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल