Headlines

'म्हशीची धार कधी काढायची, हे आता मुंबईने ठरवू नये':सतेज पाटलांचा महायुतीला खोचक टोला; गोकुळ निवडणुकीसाठी उद्या पॅनेलची घोषणा




राजर्षी शाहू समविचार आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी महायुतीच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. महायुतीचा संपूर्ण कारभार सध्या केवळ मुंबईतून चालत असून, प्रशासक आणायचा की नाही आणि अवसायानातील संस्थांना अधिकार द्यायचे की नाही, हे सर्व निर्णय मुंबईतच घेतले जात आहेत. यावरून उद्या ‘गोकुळ’चा कारभारही मुंबईतूनच चालेल अशी शक्यता वर्तवत, आता फक्त म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईने ठरवू नये, एवढीच अपेक्षा आहे, असा खोचक टोला सतेज पाटील यांनी लगावला आहे. सतेज पाटील म्हणाले, आज गोकुळ संदर्भातली आमची प्राथमिक चर्चा आहे. उद्या माघारीपूर्वी आमचे पॅनल त्या ठिकाणी घोषित होईल. त्यामध्ये कोणतीही अडचण नाही. उद्या संध्याकाळी चार वाजेपर्यंत पॅनलची घोषणा होईल. तसेच पत्रकार परिषद घेऊन पुढील 15 दिवसंतील धोरण जाहीर करू, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. तसेच गोकुळमधील ने बिनविरोध चर्चेवर त्यांनी सांगितले की, गोकुळमध्ये माघारीचा विषय नाही, आम्ही पूर्ण तयारी केली आहे. माघार हे महायुतीने सोडलेले पिल्लू आहे, अशी टीका सतेज पाटील यांनी केली. दुसरीकडे, महायुतीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून कोणताही तोडगा न निघाल्याने हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आला होता. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 9-9-7 असा जागावाटपाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, या प्रस्तावावर नेते हसन मुश्रीफ यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. मुश्रीफ यांच्या नाराजीनंतर आता त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांना दोन स्वीकृत पदांचा पर्याय देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीला 2 स्वीकृत जागांचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवताना राष्ट्रवादीला (यड्रावकर गटासह) नऊ, भाजपला (जनसुराज्यसह) नऊ, तर शिवसेना शिंदे गटाला सात जागा दिल्या होत्या. मात्र, या वाटपावर नेते हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीनंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून राष्ट्रवादीला दोन स्वीकृत जागा देण्याचा शब्द देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या नव्या तडजोडीनंतर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटून आता तरी अधिकृत घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी माघारीसाठी चुरस आणि वेळापत्रक गोकुळच्या 25 जागांसाठी सुरुवातीला 360 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 60 अर्ज अवैध ठरल्यानंतर आणि आतापर्यंत 33 जणांनी माघार घेतल्याने, सध्या जवळपास 207 उमेदवार रिंगणात शिल्लक आहेत. पॅनेलची रचना निश्चित करण्यासाठी आणखी सुमारे 150 उमेदवारांना माघार घ्यावी लागणार असल्याने या प्रक्रियेत मोठा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. उद्या, गुरुवारी अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस असून शुक्रवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. तर 18 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *