![]()
सीजेपीचे अभिजीत दिपके यांच्या आंदोलनावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशात राहत नसलेल्या व्यक्तींना अचानक देशाची चिंता कशी वाटू लागली, असा सवाल करत विखे यांनी दिपके यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एवढेच नव्हे, तर या आंदोलनामागे मोठे षडयंत्र असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. अहिल्यानगरमध्ये भाजपच्या वतीने आयोजित ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ पदयात्रेनंतर ते माध्यमांशी बोलत होते. अहिल्यानगर शहरात भाजपच्या वतीने लोकशाही बचाव आणि अराजकता हटावचा संदेश देण्यासाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील दिल्ली गेट परिसरात पदयात्रेची सांगता झाल्यानंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विरोधकांच्या आंदोलनांवर आणि त्यांच्या भूमिकेवर भाजप नेत्यांनी टीका केली. सभेनंतर माध्यमांशी संवाद साधताना सुजय विखे पाटील यांनी सीजेपी आणि अभिजीत दिपके यांच्यावर निशाणा साधला. ‘शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत केली नाही, ते देशाला शहाणपण शिकवत आहेत’ अभिजीत दिपके यांच्या आंदोलनावर बोलताना सुजय विखे पाटील म्हणाले की, जे अभिजीत दिपके गेल्या कित्येक वर्षांपासून देशातच राहत नाहीत, त्यांना अचानक देशाची काळजी कशी वाटू लागली? ज्याने आपल्या शेजाऱ्याच्या कुंपणाला हातभार लावण्यासाठी कधी मदत केली नाही, तो आज देशाला शहाणपण शिकवायला निघाला आहे, अशा शब्दांत त्यांनी दिपके यांच्यावर टीका केली. दिपके यांच्या आंदोलनामागे केवळ लोकशाही किंवा देशहिताचा मुद्दा नसून त्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही विखे यांनी केला. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे या आंदोलनामागे नेमके कोण आहे आणि त्यासाठी निधी कुठून उपलब्ध झाला, याबाबतही त्यांनी अप्रत्यक्षपणे संशय व्यक्त केला. ‘जनता मतपेटीतून विरोधकांना उत्तर देईल’ काँग्रेस, सीजेपी आणि इतर विरोधकांकडून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुजय विखे यांनी केला. विरोधकांच्या या भूमिकेला प्रत्युत्तर देण्यासाठीच अहिल्यानगरमध्ये भाजपच्या वतीने पदयात्रा काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी देशातील जनता खंबीरपणे उभी आहे, हा संदेश या पदयात्रेच्या माध्यमातून देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे विखे म्हणाले. आंदोलनामागे षडयंत्र आणि मोठा पैसा असला तरी देशातील जनता अशा प्रयत्नांना आपल्या मतदानातून चोख उत्तर देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून भाजप आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. ऊस दराच्या प्रश्नावरही विखेंनी मांडली कारखानदारांची भूमिका दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत 23 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती आणि साखरेच्या बाजारभावाचा संदर्भ देत ऊस दराचे गणित स्पष्ट केले. विखे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, यंदाचा ऊस गाळप हंगाम संपेपर्यंत साखरेचा दर 5,000 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि उसाची रिकव्हरी 11.25 ते 11.50 टक्क्यांच्या दरम्यान राहिली, तर साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना 3,500 ते 3,600 रुपये प्रति टन दर देणे शक्य होईल. अशा परिस्थितीत ऊस उत्पादकांना हा दर देण्यास कारखान्यांना कोणतीही अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या साखरेच्या बाजारभावात घसरण झाल्याचेही विखे यांनी निदर्शनास आणून दिले. साखरेचा दर नुकताच 5,000 रुपयांच्या खाली आला आहे. त्यामुळे भविष्यातील साखरेच्या बाजारभावाचा अंदाज न घेता आताच संपूर्ण हंगामासाठी ऊस दर निश्चित करणे शक्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. उद्याच्या बाजारातील साखरेच्या दरावर कारखान्यांचे आर्थिक गणित अवलंबून असल्याने ऊस दर जाहीर करताना या बाबींचा विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले. राजकीय आरोप आणि ऊस दराचा मुद्दा एकाचवेळी चर्चेत एकीकडे अभिजीत दिपके यांच्या आंदोलनावरून सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत, तर दुसरीकडे ऊस दराच्या प्रश्नावर कारखानदारांची बाजू मांडली आहे. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विखे यांनी साखरेच्या बाजारभावाशी ऊस दराची सांगड घातल्याने शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्षात आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांचीही भर पडली आहे. हेही वाचा…. ‘आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?’:अजित पवार विमान दुर्घटनेच्या तपासावरून हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या तपासावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे तटकरे यांनी म्हटले होते. याच वक्तव्याचा संदर्भ देत, ‘आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?’ असा खोचक सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आयोग, मतदारसंघ पुनर्रचना, अजित पवार विमान दुर्घटना आणि भाजपच्या राजकारणावरही भाष्य केले. सविस्तर वाचा…..
Source link
अभिजीत दिपकेंच्या आंदोलनावर सुजय विखे पाटील आक्रमक:म्हणाले, शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघाले