![]()
अमरावतीचे विश्वविक्रमी व्यक्तिमत्व विराग वानखडे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक भव्य महानाट्य सादर करणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून, यात महाराष्ट्रातील ८० कलाकारांचा समावेश असणार आहे. जागतिक कीर्तीचे कलावंत, अभियंता आणि चित्रपट निर्माते अशी विराग वानखडे यांची ओळख आहे. त्यांनी यापूर्वी आठ जागतिक विक्रम केले असून, आता ते नववा विश्वविक्रम करण्याच्या तयारीत आहेत. त्यांचे नुकतेच सादर झालेले ‘महा इतिहास’ हे महानाट्य जगभरात चर्चेचा विषय ठरले होते. या स्तुत्य उपक्रमासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांच्या पत्नी, माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी विराग वानखडे आणि आयएएस अकादमीचे प्रा. नरेशचंद्र काठोळे यांचा सत्कार केला. चिखली येथे झालेल्या भेटीदरम्यान खेडेकर दाम्पत्याने या महानाट्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. ॲड. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, “मी या महानाट्याच्या खंबीरपणे पाठीशी आहे.” हे महानाट्य छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जीवन संपूर्ण भारतात घराघरात पोहोचवण्यासाठी एक अभिनव प्रयोग ठरेल. हा जरी खर्चिक प्रयोग असला तरी, महाराजांचे विचार आणि कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा मोठा उपयोग होईल, असे ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी यावेळी सांगितले. या भेटीदरम्यान विराग वानखडे यांनी खेडेकर यांना महानाट्याची संपूर्ण रूपरेषा समजावून सांगितली. पटकथा लेखनासाठी पुरुषोत्तम खेडेकर, प्रा. अशोक राणा, गंगाधर बनबरे आणि इतर ज्येष्ठ संशोधकांचे सहकार्य घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या महानाट्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या प्रारंभिक बाबींची तयारी सुरू झाली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हे महानाट्य साकारत असल्याबद्दल मिशन आयएएसचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. वानखडे आणि काठोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महानाट्याचा पहिला प्रयोग दिवाळीनंतर सादर केला जाईल. या चर्चेदरम्यान विराग वानखडे, त्यांच्या पत्नी वंदना वानखडे आणि मिशन आयएएसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी पुरुषोत्तम खेडेकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. खेडेकर यांनी हा प्रस्ताव उचलून धरत तिघांचाही पुस्तके देऊन सन्मान केला.
Source link
अमरावतीचे विराग वानखडे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांवर महानाट्य:मिशन आयएएस अकादमीचा पुढाकार, 80 कलाकारांचा सहभाग