![]()
इंटॅक अमरावती चॅप्टरने मेळघाटातील १०० ते १३० वर्षे जुन्या ब्रिटीशकालीन यंत्रांचे संग्रहालय उभारण्याची मागणी केली आहे. जागतिक संग्रहालय दिनाच्या पार्श्वभूमीवर इंटॅकच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिले. मेळघाटात अनेक ठिकाणी रस्ते बांधणी, सागवान लाकूड तोडणे आणि बाहेर काढण्यासाठी ब्रिटिशांनी वापरलेली जुनी यंत्रे, लोखंडी चाके पडून आहेत. ही यंत्रे सध्या वापरात नसली तरी त्यांचा इतिहास रंजक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी इंटॅक संस्थेला अशा वस्तूंची यादी करून सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. इंटॅक अमरावती चॅप्टरचे संयोजक डॉ. जयंत वडतकर यांच्या मते, हे संग्रहालय तयार झाल्यास मेळघाटातील पर्यटक आणि अभ्यासकांसाठी एक नवीन दालन खुले होईल. यावेळी इंटॅकचे सदस्य अँड राजमेहेर निशाने, सचिन पेठे, सौरभ जवंजाळ, अंकुश गावंडे उपस्थित होते. सातपुडा पर्वतरांगेतील मेळघाटचे जंगल वन आणि वन्यजीव संपदेने समृद्ध आहे. या जंगलात १८५५ साली ब्रिटीश काळात वनव्यवस्थापन सुरू झाले. ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी रस्ते आणि डाकबंगले बांधले, ज्यामुळे येथील सागाचे लाकूड मोठ्या प्रमाणात देशभरात पाठवले जाऊ लागले. रस्ते बांधणी आणि इतर कामांसाठी ब्रिटिशांना यंत्रांची गरज भासू लागली. युरोपात त्याचवेळी यांत्रिक युगाची सुरुवात होऊन वाफेवर चालणारी इंजिने तयार होत होती. याच काळात मेळघाटातही काही यंत्रे आणली गेली. मेळघाटचे अभ्यासक आणि मानद वन्यजीव रक्षक डॉ. वडतकर यांनी पडून असलेल्या जुन्या मशीनचा अभ्यास केला आहे. त्यांच्या मते, मेळघाटातील पहिले यंत्र १८८७ च्या सुमारास आणले गेले असावे, जे ओढून चालणारे रोलर होते. तापी नदीकाठी रंगुबेली विश्रामगृहाजवळ जॉर्ज गहागन कंपनी बॉम्बे, १९०७ असे लिहिलेले एका रोलरचे चाक आजही पडून आहे. अकोट विभागातील धारगडजवळही १८८७ चे असेच एक रोलर व्हील आहे.
Source link
मेळघाटातील ब्रिटीशकालीन यंत्रांचे संग्रहालय व्हावे:इंटॅकने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी