![]()
अमरावतीत दिवाळीत फटाके उडवण्यासाठी सकाळी ६ ते ७ आणि रात्री ८ ते १० ही वेळ ठरवण्यात आली आहे. नागरिकांना शहरातील ठरवून दिलेल्या १२ ठिकाणीच फटाके उडवता येतील. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागरिकांनी या वेळेतच पर्यावरणपूरक ग्रीन फटाके उडवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अमरावती महापालिकेने हे निर्देश दिले आहेत. शहरातील पाच झोनमध्ये सामुदायिक फटाके उडवण्यासाठी १२ मोकळी मैदाने आणि ठिकाणे निश्चित केली आहेत. वैयक्तिक स्तरावर इतरत्र फटाके उडवण्याऐवजी नागरिकांनी या ठिकाणांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मनपाने शुक्रवारी ठिकाणांबाबतचे निर्देश जारी केले. त्यानंतर आज वेळेचे बंधनही जाहीर केले. ग्रीन फटाके कोणते? पारंपरिक फटाक्यांच्या तुलनेत ग्रीन फटाक्यांमुळे कमी प्रदूषण होते. पर्यावरण क्षेत्रातील संस्था ‘नीरी’ने यासाठीचे सूत्र विकसित केले आहे. हे फटाके सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइडसारख्या प्रदूषकांचे प्रमाण जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी कमी करतात. हे फटाके फुटताना पाण्याचे सूक्ष्म कण हवेत सोडतात. त्यामुळे आजूबाजूची धूळ हवेत पसरण्याऐवजी खाली बसण्यास मदत होते. रॉकेट, भुईचक्र, अनार आणि फुलबाजांचे ग्रीन प्रकार यात समाविष्ट आहेत. या फटाक्यांवर ‘नीरी’चा प्रमाणित लोगो किंवा क्यूआर कोड असतो. शाळा, दवाखान्यांजवळ फटाके उडवण्यास मनाई रस्ते, गल्ल्या, पदपथ तसेच रुग्णालये आणि शाळांसारख्या शांतता क्षेत्रांच्या परिसरात फटाके उडवण्यास मनाई आहे. शहरातील हवेची गुणवत्ता आणि नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी नियमांचे पालन करून सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असे आवाहन अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ. महेश गोंदावले यांनी केले.
Source link
अमरावतीत फटाके उडवण्याची वेळ ठरवली:सकाळी 6 ते 7 आणि रात्री 8 ते 10 ; 12 ठिकाणीच ग्रीन फटाके उडवता येणार