Headlines

अमरावती जिल्ह्यात 48 पैकी 36 सीएचओंच्या बदल्या:एकाचा नकार, 11 अधिकारी गैरहजर; शनिवारी पार पडली प्रक्रिया




अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ) यांच्या विनंती बदल्यांची प्रक्रिया शनिवारी, ३० मे रोजी पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेत ४८ पैकी ३६ डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदली प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विशेष ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली होती. एकूण ४८ समुदाय आरोग्य अधिकारी सहभागी होणे अपेक्षित होते. त्यापैकी ११ अधिकारी गैरहजर राहिले, तर एका अधिकाऱ्याने बदलीस नकार दिला. उर्वरित ३६ समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार समुपदेशनाद्वारे त्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यावेळी सीईओ सत्यम गांधी यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लोकाभिमुख आरोग्य सेवांना प्राधान्य दिले. बदल्यांच्या प्रक्रियेमुळे आरोग्य सेवांचे अधिक प्रभावी नियोजन होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी, जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पराग राठोड, एनएचएमचे जिल्हा लेखा व्यवस्थापक अशोक कोठारी तसेच आरोग्य विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *