![]()
पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गणेश मंडळांना ध्वनिमर्यादेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ध्वनिप्रदूषणाच्या वाढत्या उल्लंघनामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे पोलिस दलावर मंडळांनी आतापर्यंत जसा विश्वास दाखवला आहे, तसाच यंदाही दाखवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना आयुक्त कुमार यांनी सोशल मीडियावरील वक्तव्यांवर चिंता व्यक्त केली. काही जण मर्यादा सोडून बेताल वक्तव्य करत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना सामाजिक आणि कायदेशीर मर्यादा पाळणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात काही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. रहिवासी भागातील ध्वनीची मर्यादा निश्चित आहे, पण गेल्या काही दिवसांपासून तिचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे गणेश भक्त आणि प्रशासनाने एकत्र येऊन यावर मार्ग काढण्याची गरज आहे. मंडळांनी प्रेशर मिड आणि प्लाझ्मा ध्वनियंत्रणा न लावण्याचा निर्णय घेतला आहे, हे स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी सांगितले. चार बेस आणि चार टॉप ध्वनियंत्रणा वापरूनही डेसिबल मर्यादा पाळता येते. मात्र, मंडळांनी आवाजाची पातळी मोजून कोणत्याही परिस्थितीत ध्वनीमर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. लेसर लाईटवर पूर्णपणे बंदी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. हिंसक मार्ग अवलंबणे योग्य नाही, असे कुमार म्हणाले. वक्तव्य करताना नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाईल, पण पोलिस प्रशासन मंडळांसोबत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विसर्जन मिरवणूक वेळेआधी किंवा उशिरा संपण्यापेक्षा गर्दी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था आणि शांततापूर्ण वातावरण अधिक महत्त्वाचे आहे. विसर्जन मिरवणुकीचे पास डिजिटल करण्यासोबतच टिळक रस्ता आणि लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. महिला सुरक्षा, वाहतूक, खड्डे आणि प्रकाशव्यवस्थेच्या प्रश्नांसाठी पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांनी मंडळांशी थेट संवाद साधावा, अशी सूचना देण्यात आली. गणेश मंडळांनी अमली पदार्थविरोधी जनजागृती मोहीमही राबवावी, अशी अपेक्षा आयुक्त कुमार यांनी व्यक्त केली. पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला जाहीर विरोध करून राज्यभरात चर्चेत आलेले पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना अचानक आलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यानंद बापट हे टिळक रोडवरील कशाळे चौक परिसरात वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते. त्याच वेळी स्थानिक गणेश मंडळांशी संबंधित असल्याचे सांगणाऱ्या 4 ते 5 तरुणांचा गट तिथे आला. त्यांनी बापट यांना अडवून त्यांच्याशी वाद घातला आणि काही क्षणांतच त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिक आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी काही काळ अवाक झाले होते. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना भररस्त्यात मारहाण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संतोष चव्हाण असे या आरोपीचे नाव असून, तो एका स्थानिक गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे निर्देश दिले असून, शहरात अशा प्रकारची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Source link
गणेश मंडळांनी ध्वनिमर्यादा पाळावी, पोलिस आयुक्तांचे आवाहन:कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करा, सोशल मीडियावरील बेताल वक्तव्यांवर कारवाई