Headlines

अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी पोलिसांची धरपकड:काँग्रेसचा दडपशाहीचा आरोप; शहरात कडेकोट बंदोबस्त




केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शनिवारी होणाऱ्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीपासून प्रमुख आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. काही कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसाही बजावण्यात आल्या असून, दौऱ्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, पुणे-सातारा रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसरात काँग्रेसला आंदोलनाची परवानगी देण्यात आली असली तरी आंदोलनस्थळाच्या चारही बाजूंनी बॅरिकेड्स उभारून कार्यकर्त्यांना अक्षरशः घेरल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि शहर जिल्हाध्यक्ष दीप्ती चौधरी यांनी केला आहे. यावेळी प्रशांत जगताप म्हणाले, “दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमार प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा. विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई करणे ही त्यांची नेहमीची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी त्यांच्यावर दडपशाही केली जात आहे. ही बाब काँग्रेस कदापि सहन करणार नाही.” अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रमुख मार्गांवर नाकाबंदी, वाहतूक नियंत्रण तसेच कार्यक्रमस्थळांवर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. तसेच अमित शहा यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांची तपासणी देखील विविध पातळ्यांवर करण्यात येत आहे .केवळ निमंत्रितांना कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश दिला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *