Headlines

अर्थखात्यावरून राष्ट्रवादीला मुख्यमंत्री फडणवीस ब्लॅकमेल करत असल्याचा सपकाळांचा आरोप:अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणासह शेतकरी मदतीवरूनही सरकारला धारेवर धरले




काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरून राज्य सरकार तसेच सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला राज्याच्या अर्थखात्याचा कारभार मिळवण्याची धमक नसल्याचा टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही प्रकरणांचा आधार घेऊन राष्ट्रवादीला ब्लॅकमेल करत अर्थखाते स्वतःकडे ठेवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके कोणते प्रकरण आहे आणि त्यातून कोणावर दबाव टाकला जात आहे, याचा संबंधित पक्षाने खुलासा करावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली. सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते मिळवता येत नाही, ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची बाब आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीला एखाद्या प्रकरणाच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून अर्थखाते स्वतःकडे ठेवत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. यामागे नेमके काय कारण आहे, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केले पाहिजे. या दोनपैकी नेमकी वस्तुस्थिती कोणती, याचा खुलासा राष्ट्रवादीने करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले. अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे काय झाले? दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणावरूनही सपकाळ यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. अजित पवार यांनी 104 वेळा चार्टर विमानातून प्रवास केला होता, मात्र त्यांच्या मृत्यूमागे घातपात होता की तो अपघात होता, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. या प्रकरणाचा चौकशी अहवाल अजूनही सार्वजनिक झालेला नाही. त्यामुळे चौकशी नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात विविध स्तरांतून सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या संदर्भात चौकशीची मागणी केली होती. मात्र, त्यानंतर नेमकी काय कारवाई झाली, याची माहिती समोर आलेली नाही. काँग्रेसचीदेखील या प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची मागणी असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. विमान कंपनीच्या मालकाचे नेमके कोणाशी संबंध आहेत, याचीही चौकशी झाली पाहिजे. संबंधित कंपनीच्या मालकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा दावा करत, एका व्यक्तीला वाचवण्यासाठी कारवाई केली जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या शंकांकडे दुर्लक्ष का? अजित पवार यांच्या मृत्यूबाबत आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि मांडलेले पुरावे हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असल्याचे सपकाळ म्हणाले. या प्रकरणात घातपात झाला की अपघात, याबाबत रोहित पवार सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दिवसेंदिवस या मृत्यूबाबत संशय अधिक गडद होत असल्याचेही त्यांनी म्हटले. या घटनेला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आले, तरी तपासाच्या बाबतीत ठोस माहिती समोर आलेली नाही. आरोपींना शोधून काढण्याच्या घोषणा करणारे मुख्यमंत्री प्रत्यक्षात मात्र काहीच करत नसल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. अजित पवार यांच्या मृत्यू प्रकरणात काहीतरी लपवाछपवी सुरू असल्याचा संशय व्यक्त करत, या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली. ‘शिंदेसेना नव्हे, गद्दारांची टोळी’ शिवसेनेच्या शिंदे गटावरही सपकाळ यांनी निशाणा साधला. शिंदेसेना ही खरी शिवसेना नसून गद्दारांची टोळी असल्याची टीका त्यांनी केली. ज्या बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून राजकारणात पुढे आले, त्यांच्याच विचारांशी आणि पक्षाशी गद्दारी करण्यात आली. आता बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही काढण्यात आला आहे, असे म्हणत त्यांनी शिंदे गटाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या व्यक्तिगत चारित्र्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांचाही सपकाळ यांनी निषेध केला. अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्यांची मानसिक दिवाळखोरी दिसून येते. ही विकृत मानसिकता असून अशा प्रवृत्तींना योग्य धडा शिकवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत म्हणजे जखमेवर मीठ राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरूनही सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर करण्यात आलेली 5 हजार रुपयांची मदत अत्यंत अपुरी असल्याचे त्यांनी म्हटले. मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्यात आल्या आहेत. पाच हजार रुपयांची मदत देण्याचे नाटक करून सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या मदतीव्यतिरिक्त राज्य सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी यासाठी काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सरकारने मागणी मान्य करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी योजना राबवा केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर भूमिहीन शेतमजुरांनाही आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे सपकाळ यांनी अधोरेखित केले. दुष्काळ आणि आर्थिक संकटामुळे शेतमजुरांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांच्या समस्यांकडेही सरकारने लक्ष दिले पाहिजे. शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी योजना राबवण्याची मागणी त्यांनी केली. शेतमजुरांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून देणे, गावातच रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करायला हव्या होत्या. जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता करण्यासाठी इतर राज्यांतूनही चारा आणण्याचे नियोजन सरकारने करणे गरजेचे होते, असे ते म्हणाले. याशिवाय ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन, जनावरांसाठी चारा आणि मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न या सर्व बाबींमध्ये सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. दुष्काळाच्या परिस्थितीत सामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर आणि पशुधन यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. मात्र, सरकार या प्रश्नांबाबत उदासीन असून, सरकार मुकं, बहिरं आणि आंधळं झाल्याची घणाघाती टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. हेही वाचा… राज्यातील आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित:शेतकऱ्यांना दिलासा, कर्जवसुलीला स्थगिती अन् वीजबिलात सवलत राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राज्यातील 304 तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते. आता त्यामध्ये आणखी 6 तालुक्यांची भर पडली आहे. नाशिक, पालघर, रत्नागिरी आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांतील सहा तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित तालुक्यांतील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांना विविध सवलती व उपाययोजनांचा लाभ मिळणार आहे. यामध्ये जमीन महसुलात सूट, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जांच्या वसुलीला स्थगिती, कृषिपंपांच्या वीजबिलात सवलत तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी अशा महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. सविस्तर वाचा…..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *