![]()
हिंगोली येथील बसस्थानकामध्ये एका टोळक्याने अर्धे तिकीट देण्याच्या करणावरून वाहकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे आगाराचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते. या प्रकरणी नऊ जणांवर गुरुवारी ता. २ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तातडीने पथक स्थापन करून ८ जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली आगाराची केंद्रा ते हिंगोली बस गोरेगाव मार्गे हिंगोलीकडे येत होते. यावेळी गोरेगाव येथून एक प्रवासी बसमध्ये बसला होता. यावेळी वाहक संजय अडकिणे यांनी त्या प्रवाशाला तिकीट घेण्याची सुचना केली. मात्र त्याने १९७१ रोजी जन्म असलेले वयाचे कार्ड दाखवून अर्धे तिकीट देण्याची मागणी केली. मात्र त्याच्या जवळील कार्ड वरून वाहक अडकिणे यांनी पूर्ण तिकीट घेण्याचे सांगितले. यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. या वादानंतर संबंधित प्रवाशाने त्याच्या मुलासोबत मोबाईलवरून संपर्क साधून माहिती दिली व वाहकाने उध्दट वागणून दिल्याचे सांगितले. त्यानंतर त्या प्रवाशाच्या मुलाने सदर बस आगारामध्ये येताच वाहक अडकिणे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीमुळे अडकिणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आगाराचे कामकाज बंद केले. जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत काम सुरु करणार नाही अशी भुमीका घेतली. त्यानंतर आगाराच्या वरिष्ठ अधिकारी व पोलिसांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढल्यानंतर दोन तासांनी कामकाज सुरु झाले. या प्रकरणी अडकिणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिसांनी विशाल शिरसाठ, राहुल पुंडगे, दिलीप शिरसाट, अजय सोनाळे, बाळू राठोड, संतोष बांगर, सुभाष करे, कृष्णा सिरोळे, पिराजी राठोड यांच्या विरुध्द शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक गजेंद्रसिंह ठाकुर, उपनिरीक्षक गजानन गिरी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे यांचे पथक स्थापन करण्यात आले. या पथकाने पिराजी राठोड वगळता आठ जणांना ताब्यात घेतले आहे.
Source link
अर्धे तिकिट देण्याच्या कारणावरून वाहकाला मारहाण:9 जणांवर गुन्हा दाखल, हिंगोली आगाराचे कामकाज काही काळ विस्कळीत