![]()
मराठवाड्यात अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात 6.18 लाख शेतकऱ्यांपैकी 1.30 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 932 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे.यामध्य सर्वात जास्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 35 हजार शेतकऱ्यांना 232 कोटी रुपयांचा समावेश आहे. राज्य शासनाने अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहिर केली आहे. त्यानुसार शासनाने प्रायोगिकतत्वावर 533 शेतकऱ्यांची यादी जाहिर केली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या याद्या ता. 24 जून रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविल्या होत्या. त्यानुसार या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या असून सहाय्यक निबंधक कार्यालय व मध्यवर्ती बँकेच्या सूचना फलकावर या याद्या प्रसिध्द केल्या आहेत. यामध्ये मराठवाड्यातील कर्जमुक्ती मिळालेल्या 6.18 लाख शेतकऱ्यांची यादी जाहिर झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त 1 लाख 75 शेतकरी जालना जिल्ह्यातील असून सर्वात कमी शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील 44 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी सोबतच आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार मराठवाड्यातील आपले सरकार सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी गर्दी होत आहे. मोबाईलवरील ओटीपी क्रमांकावरून आधार प्रमाणीकरण करणे बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून आधार प्रमाणीकरण करण्याचे काम करावे लागत आहे. दरम्यान, मराठवाड्यात आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत मराठवाड्यातील 1.30 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 932 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात जास्त 35 हजार 540 शेतकऱ्यांच्या खात्यात 231 कोटी रुपये जमा झाले आहेत तर परभणी जिल्ह्यात सर्वात कमी 7870 शेतकऱ्यांच्या खात्यात 6.04 कोटी रुपयेच जमा झाले आहे. मराठवाड्यात कर्जमुक्ती मिळालेले जिल्हानिहाय शेतकरी संख्या छत्रपती संभाजीनगर 99648, जालना 1 लाख 75, बीड 97222, धाराशिव 46046, लातुर 54373, नांदेड 96920, परभणी 79855 तर हिंगोली जिल्ह्यातील 44177 शेतकऱ्यांचा समावेश आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेले शेतकरी व कंसात जमा झालेली रक्कम छत्रपती संभाजीनगर 35540 शेतकरी (231 कोटी), बीड 13110 (90.74 कोटी), धाराशिव 12214 (105 कोटी), हिंगोली 7516 (63.54 कोटी), जालना 18792 (116 कोटी), लातुर 22963 (159कोटी), नांदेड 12929 (106 कोटी), परभणी 7870 (60कोटी). आधार प्रमाणीकरण करून घ्यावे- जिल्हा उपनिबंधक हिंगोली जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे म्हणाल्या की, कर्जमीफाची लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. त्या सोबतच आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असून उर्वरीत शेतकऱ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे ज्यामुळे कर्जमाफीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
Source link
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती:मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात 1.30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 932 कोटी जमा; संभाजीनगर आघाडीवर