Headlines

अहिल्यानगरमध्ये जेवण न दिल्याने पत्नीचा भींतीवर डोके आपटून खून‎:वाद सुरू असतानाच सासऱ्याने सुनेच्या ‎नातेवाईकाला कळवले‎, आरोपी पतीला गेवराईतून अटक




जेवण न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करत तिचे डोके भिंतीवर आपटून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बुरुडगाव येथील तांबे मळा परिसरात घडली आहे. मनिषा सुभाष खरात असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपी पती सुभाष रखमाजी खरात याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नगर तालुका पोलिसांनी त्याला गेवराई येथून बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मयत मनिषा आणि तिचा पती सुभाष हे मूळचे गेवराई परिसरातील असून, मजुरीच्या कामासाठी 1 जुलै रोजी बुरुडगाव येथील तांबे मळा येथे विठ्ठल पोकळे यांच्या घरात भाड्याने राहण्यासाठी आले होते. मात्र, या पती-पत्नीत क्षुल्लक कारणावरून सतत भांडणे होत असत. 18 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास जेवण न दिल्याच्या कारणावरून दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या सुभाषने मनिषाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास तिचे मुंडके पकडून डोके जोराने भिंतीवर आपटले. यात गंभीर दुखापत होऊन मनिषा जागीच कोसळल्यानंतर आरोपीने तिला घराबाहेर फेकून दिले आणि तेथून पळ काढला. नातेवाईकांनी गाठले रुग्णालय घटनेच्या रात्री आरोपीच्या वडिलांनी मध्यरात्री नातेवाईक रोहिणी हजारे यांना फोन करून पती-पत्नीत तीव्र वाद सुरू असल्याचे सांगितले. रोहिणी यांनी तत्काळ मयत मनिषाचा भाऊ गणेश घोडके याला माहिती दिली. माहिती मिळताच गणेश घोडके यांनी रात्री 1 वाजेच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली असता, त्यांची बहीण घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली. त्यांनी तिला तात्काळ रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. गेवराईतून आरोपी पती गजाआड या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ गणेश घोडके याच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात आरोपी सुभाष खरात याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा माग काढला आणि त्याला गेवराई परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *