Headlines

आपल्याकडे खेड्यातील न्हावीही प्लास्टिक सर्जरी करायचे!:स्वतःच्या मुली विकणाऱ्या ब्रिटिशांनी भारतीयांना समतेचे शहाणपण शिकवू नये; भालचंद्र नेमाडेंचे प्रतिपादन




“भारताला हजारो वर्षांची अत्यंत समृद्ध आणि प्रगत ज्ञानपरंपरा लाभलेली आहे. प्राचीन भारतात अगदी खेड्यापाड्यातील न्हावीदेखील ओठ आणि दात नीट करण्यासारखी गुंतागुंतीची प्लास्टिक सर्जरी करायचे आणि हे पाहून इंग्रजांना आश्चर्य वाटायचे. आपल्याकडे इसवी सन पूर्व पहिल्या शतकात म्हणजेच सुमारे 2,127 वर्षांपूर्वी खेड्यातील महिला कविता लिहीत होत्या. ज्या ब्रिटिशांच्या समाजात जेन ऑस्टिनच्या आधी एकही लेखिका नव्हती आणि स्वतःच्या मुली विकण्याची प्रथा होती, त्या ब्रिटिशांनी आम्हाला समता, स्वातंत्र्य आणि बंधुभावाचे शहाणपण शिकवण्याची गरज नाही,” असे रोखठोक आणि परखड प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केले आहे. नागपूर येथे ‘हिंदू रिसर्च फाउंडेशन’च्या वतीने आयोजित सप्तर्षी पुरस्कार सोहळ्यात भालचंद्र नेमाडे यांना महर्षी वाल्मिकी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानव्यवस्था, स्त्री लेखिकांची ऐतिहासिक परंपरा, हिंदुत्वाची सर्वसमावेशक संकल्पना आणि पाश्चात्त्य मानसिकतेवर विस्तृत भाष्य केले. गाथासप्तशतीत 15 कवयित्री; इंग्लंडमध्ये जेन ऑस्टिनच्या आधी महिला लेखिका कोण होती? भारतातील प्राचीन स्त्री साहित्याचा संदर्भ देत नेमाडे म्हणाले, “आपल्याकडे वैदिक काळातील गार्गी आणि मैत्रेयी यांच्यापासून ते अगदी प्राकृत-मराठीतील ‘गाथासप्तशती’पर्यंत महिला लेखिकांची मोठी गौरवशाली परंपरा आहे. इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील (सुमारे 2,127 वर्षांपूर्वीच्या) गाथासप्तशतीमध्ये जवळपास 700 ते 750 अप्रतिम गाथा असून, त्यामध्ये सुमारे 15 ग्रामीण कवयित्रींच्या रचनांचा समावेश आहे.” ब्रिटिशांचा पोकळ मोठेपणा “मी स्वतः इंग्रजी साहित्याचा प्राध्यापक राहिलो आहे. इंग्लंडमध्ये जेन ऑस्टिनच्या आधी कोणती महिला लेखिका होऊन गेली? तिथे सर्व पुरुष लेखकच होते. ज्यांच्याकडे स्वतःच्या मुली विकण्याची विकृती होती, ते इंग्रज आज आपल्याला स्त्री-पुरुष समतेचे धडे देतात. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या गोष्टी बाहेरून शिकण्याची भारताला अजिबात गरज नव्हती.” खेड्यातील न्हावी करायचे प्लास्टिक सर्जरी; प्राचीन वैद्यक पाहून इंग्रज थक्क झाले! भारतातील प्राचीन वैद्यकशास्त्राचा गौरव करताना त्यांनी स्पष्ट केले. “आपल्या देशातील खेड्यापाड्यातील न्हावीदेखील चेहऱ्यावरील ओठ बाहेर आले असल्यास ते कापणे-जोडणे, दात नीट बसवणे यांसारखी प्लास्टिक सर्जरी सहजतेने करायचे. हे कौशल्य पाहून भारतात आलेल्या ब्रिटिशांचे डोळे पांढरे झाले होते.” भूतकाळ विसरल्याने वाईट दिवस “दुर्दैव असे आहे की आपण केवळ वर्तमानकाळाच्या मागे धावू लागलो आणि आपला जाज्वल्य भूतकाळ विसरलो. जितका तुम्ही भूतकाळ विसराल, तितका तुमचा वर्तमानकाळ खराब होईल. इंग्लंडसारख्या क्षुद्र देशाला आपण मोठे मानत बसलो, हीच आपली घोडचूक ठरली.” ‘हिंदू’ या शब्दाचा अर्थ संकुचित करू नका हिंदू संकल्पनेची आणि संस्कृतीची विशालता मांडताना त्यांनी संस्थांना आवाहन केले. “सध्या ‘हिंदू’ या शब्दाला संकुचित करून जो वाईट अर्थ लावला जात आहे, तो ‘हिंदू रिसर्च फाउंडेशन’सारख्या संस्थांनी बदलला पाहिजे. आपण मुळातच अत्यंत व्यापक विचारसरणीचे आहोत.” अखंड सांस्कृतिक व्याप्ती “आपला हिंदुत्ववाद किंवा संस्कृती ही अत्यंत विस्तीर्ण आहे. त्यावेळी अफगाणिस्तानही हिंदुस्तानाचाच भाग होता. अफगाणिस्तान, नेपाळ आणि अगदी चीनपर्यंतचे लोक आपल्या संस्कृतीशी जोडलेले आहेत. ही जगभरातील पुण्यभूमी असून तो आपल्या स्वाभिमानाचा विषय आहे, त्यामुळे आपल्याकडे जे अथांग ज्ञानभांडार आहे तेच आपण पुढे वाढवले पाहिजे,” असा पुनरुच्चार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी शेवटी केला. ——————————————————————————— हेही वाचा… पर्याय असेल तर जंगल वाचवलंच पाहिजे, आवश्यक नसताना वृक्षतोड नकोच: सुधीर मुनगंटीवारांनी भूमिका, म्हणाले- संवादातून मार्ग काढला पाहिजे भीमाशंकरच्या जंगलात वृक्षतोडीवरून राज्यात वाद पेटला असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आवश्यक नसताना कोणतीही वृक्षतोड करू नये हीच वनविभागाची आणि केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *