![]()
नामांकित खासगी शाळेत आरटीई (राइट टू एज्युकेशन) अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी 2 खोल्यांच्या घरकुलात बाहेरगावातील 4 कुटुंबे वास्तव्य करत आहेत, असा भाडेकरारनामा काही पालकांनी शासकीय यंत्रणांना हाताशी धरून केला आहे. हा प्रकार मानूर (ता. कळवण) ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेघर घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या व्यक्तीने व काही पालकांनी केला आहे. त्याचे पुरावेही ‘दिव्य मराठी’कडे आहेत. भाडे करारनामा करताना ना ग्रामपंचायतीची परवानगी घेतली ना पंचायत समितीची. आरटीई (राइट टू एज्युकेशन) अंतर्गत खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी 25% जागा राखीव असतात. नामांकित शाळांमध्ये आपल्या पाल्यांना प्रवेश मिळावा यासाठी काही पालकांनी घरमालकाशी संपर्क साधून त्यांना पैसे देऊन भाडेकरार करून घेतले. परिणामी मानूर गावातील फक्त 3, कळवण खुर्दच्या 3 विद्यार्थ्यांचा सोडतीत नंबर लागला तर इतर गावातील 21 विद्यार्थी बाहेरचे आहेत. घरमालक : प्रवेशासाठी करारनामे ग्राह्य धरू नका घरमालक कैलास बोरसे यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे की, काही पालकांनी त्यांच्या कामासाठी भाडे करारनामे करून घेतले आहेत. मात्र, त्यापैकी येथे कुणीही राहत नाही. त्यामुळे हे करारनामे आरटीई प्रवेशासाठी ग्राह्य धरू नये. नियम असा : गावात नोकरी, व्यवसाय असला पाहिजे आरटीई प्रवेशासाठी भाडेकरार करणारी व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करत असल्याची नोंद असावी. ती व्यक्ती खरोखर भाडोत्री राहत असावी. त्याची ग्रामपंचायत दप्तरी नोंद असावी. तरच भाडे करारनामा प्रवेशासाठी ग्राह्य धरला जातो. मात्र प्रवेशासाठी हा नियम गुंडाळून ठेवला जातो. 1 ते 3 किमी अंतराच्या प्रवेशाच्या अटीचे उल्लंघन कैलास बोरसे यांच्यासोबत भाडेकरार करणारे पाळे खुर्द, मोकभनगी, गणोरे दह्याने, शिरसमनी या गावातील आहेत. त्यांचे गाव 5 ते 20 किमी अंतरावर आहे. नियम 1 ते 3 किमीचा आहे. 270 स्क्वेअर फुटांच्या घरात चौघांचा भाडेकरार मानूर ग्रामपंचायतीच्या दप्तरात कैलास बोरसे यांच्या घरकुलाची त्यांच्या दोन खोल्यांच्या 18 बाय 15 (270 स्क्वेअर फूट ) अशा केवळ एका घरकुलाची नोंद आहे. याच घरावर चार भाडे करारनामे करण्यात आले आहेत. परवानगी न घेता भाडेकरार, चौकशी करू ग्रामपंचायत मिळकतीचा उपभोग घेणाऱ्या भोगवटादारांनी अधिकृत परवानगी न घेता भाडे करारनामे केल्याची बाब निदर्शनास आली आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांना माहितीसह पत्र पाठवण्यात आले आहे. – निर्मला खांडवी, ग्रामसेविका, मानूर कागदपत्रे तपासणीकडे पाठ फिरवली आरटीई सोडतीत नंबर लागूनही बहुतांश पालकांनी कागदपत्र तपासणीकडे पाठ फिरवली आहे. फक्त दोन पालक 4 दिवसांपूर्वी आले होते. मात्र चौकशीचे सांगताच त्यांनी कागदपत्रे पडताळणी न करताच रस्ता धरला. – पी. पी. महाले, गटशिक्षणाधिकारी, कळवण शासनाची दिशाभूल, पुन्हा सोडत काढावी आरटीईसाठी सादर केलेले भाडे करारनामे किमान एक वर्षापूर्वीचे असावेत. केवळ नामधारी भाडेकरार करून शासनाची दिशाभूल केली आहे. त्यामुळे पुन्हा सोडत काढावी. – कपिल पवार, वंचित पालक, मानूर कारण : भाडेकरारासाठी 10 ते 50 हजार मिळतात । परिणाम : बाहेरगावचे सर्वात जास्त विद्यार्थी पात्र । जबाबदार : रहिवासी, मुद्रांक अन् शिक्षण विभाग
Source link
आरटीई प्रवेशासाठी 2 खोल्यांच्या घरात 4 पालकांचा भाडेकरारनामा:नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी अट शाळेपासून 3 किमीची